Prajakta Mali : “बाय बाय मुंबई…” प्राजक्ता माळीच्या भावनिक पोस्टने चाहते काळजीत

Asavari Khedekar Burumbadkar

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, निवेदिका आणि नृत्यांगना म्हणून प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) नाव घराघरात पोहोचलं आहे. तिच्या अभिनयाबरोबरच ती कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही ओळखली जाते. पण यावेळी ती कोणत्याही नव्या प्रोजेक्टमुळे नाही, तर तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली.

इंस्टाग्रामवर पोस्ट (Prajakta Mali) 

अलीकडेच प्राजक्तानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टोरी शेअर केली. त्या फोटोमध्ये ती मुंबई विमानतळावर दिसत होती, आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं – “बाय बाय मुंबई… मला तुझी खूप आठवण येईल. मी लवकरच परत येईन…” हे वाक्य वाचताच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. प्राजक्ता मुंबई सोडून कुठे चालली आहे का? ती काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेतेय का? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या.

चाहत्यांनी केल्या कमेंट्स

तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करत कमेंट्सचा वर्षाव केला. काहींनी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी तिला काय झालंय असा प्रश्न विचारला. पण काही वेळातच प्राजक्तानं स्वतःच या चर्चेला पूर्णविराम दिला. पुढील स्टोरीमध्ये तिनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सचिन मोटे, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके आणि सचिन गोस्वामी हे कलाकारही तिच्यासोबत दिसले.

त्या फोटोवरून स्पष्ट झालं की प्राजक्ता (Prajakta Mali) कायमची मुंबई सोडून चालली नव्हती, तर ती नागपूरमध्ये होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमासाठी रवाना झाली होती. त्यामुळे तिचं “बाय बाय मुंबई” हे फक्त प्रवासाचं सूचक वाक्य होतं. हे समजताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि तिच्या पोस्टवर पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव झाला. “नागपूरला स्वागत आहे प्राजक्ता!” आणि “तुझ्या नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा!” अशा कमेंट्स सोशल मीडियावर उमटल्या.

दरम्यान, प्राजक्ता माळी ही केवळ तिच्या अभिनयाने नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाने आणि चाहत्यांशी असलेल्या जवळिकीमुळेही सर्वांची लाडकी आहे. तिच्या एका साध्या पोस्टमुळे एवढं मोठं कुतूहल निर्माण होणं हे तिच्या लोकप्रियतेचं प्रतीक आहे. शेवटी हेच स्पष्ट झालं की प्राजक्ता मुंबई सोडून गेली नव्हती, ती फक्त महाराष्ट्राच्या आणखी एका कोपऱ्यात आपली कला रंगवण्यासाठी निघाली होती

ताज्या बातम्या