Priyanka Chopra : प्रियंका चोप्राचा दमदार कमबॅक! राजामौलींच्या ‘ग्लोब ट्रॉटर’मध्ये ‘मंदाकिनी’च्या भूमिकेत दिसणार देसी गर्ल

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही ठिकाणी आपल्या अभिनयाची जादू दाखवलेली ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा भारतीय सिनेमात पुनरागमन करत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘ग्लोब ट्रॉटर’ या बहुचर्चित आणि मेगा प्रोजेक्टमध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियंका ‘मंदाकिनी’ नावाच्या दमदार आणि रहस्यमय पात्रात झळकणार आहे.

ग्लोब ट्रॉटर मध्ये प्रियांकाचा फर्स्ट लूक

अलीकडेच ‘ग्लोब ट्रॉटर’मधून प्रियंकाचा पहिला लुक समोर आला असून, त्याने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली आहे. पोस्टरमध्ये प्रियंका पारंपरिक पिवळ्या साडीत, हातात गन घेतलेली आणि चेहऱ्यावर तीव्र भाव घेऊन दिसत आहे. तिच्या या अवतारात साडीतील सोज्वळपणा आणि एक्शनचा मिलाफ स्पष्ट दिसतो. चाहत्यांना तिचा हा देसी परंतु धाडसी अंदाज अतिशय भावला आहे.

दिग्दर्शक राजामौलींनी स्वतः हा लुक शेअर करताना लिहिले, “ती महिला जिने भारतीय सिनेमाला जागतिक ओळख दिली… Welcome back, Desi Girl.” या एका वाक्यात त्यांनी प्रियंकाच्या भारतीय सिनेमातील योगदानाची दखल घेतली आहे. प्रियंकाने देखील आपला हा लुक इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “जो दिसतंय त्यापेक्षा खूप काही आहे… मंदाकिनीला हॅलो बोला.” यावरूनच तिच्या पात्रात अनेक थर आणि रहस्य दडलेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चाहत्यांमध्ये उत्साह (Priyanka Chopra)

प्रियंकाच्या या नव्या लुकने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी या पोस्टरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक युजर म्हणतो, “साडीमध्ये गन घेऊन अॅक्शन करताना प्रियंका म्हणजे वाइल्ड आणि शानदार कॉम्बिनेशन!” तर दुसऱ्याने लिहिले, “याच मंदाकिनी लुकची वाट पाहत होतो.” अनेकांनी तिला “क्वीन ऑफ ग्लोबल सिनेमा” अशी उपाधी दिली आहे.

‘ग्लोब ट्रॉटर’मध्ये प्रियंकासोबत मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन ‘कुंभा’ नावाच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच दक्षिणेकडील सुपरस्टार महेश बाबू यांचाही या चित्रपटात महत्त्वाचा सहभाग असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांचा लुक अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार असून, त्याचा प्रीमियर जिओ हॉटस्टारवर होईल.

राजामौलींची ही नवीन फिल्म भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात प्रदर्शित केली जाणार आहे. ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली’नंतर राजामौलींच्या या प्रोजेक्टकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमाची नवी ओळख जगभर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ग्लोब ट्रॉटर’मधील प्रियंका चोप्राचा ‘मंदाकिनी’ अवतार आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या लुकमुळे आणि राजामौलींच्या दिग्दर्शनामुळे हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक अपेक्षित प्रोजेक्टपैकी एक ठरला आहे.

ताज्या बातम्या