पंजाबी संगीत सृष्टीतील लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांचे निधन (Rajvir Jawanda Death) झाले आहे. २७ सप्टेंबर रोजी त्यांचा भीषण रस्ते अपघात झाला होता, ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी सलग १२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर ८ ऑक्टोबर रोजी, वयाच्या केवळ ३५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मल्टिपल ऑर्गन फेल – Rajvir Jawanda Death
राजवीर यांच्या अपघातानंतर त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. डॉक्टरांच्या टीमने त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांच्या दुखापती गंभीर होत्या. अपघातात त्यांच्या डोक्याला आणि मणक्याला जबर दुखापत झाली होती. उपचारांदरम्यान त्यांना कार्डियाक अरेस्ट देखील आले. यानंतर त्यांचे मल्टीपल ऑर्गन फेल झाले आणि त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांचे निधन झाले.

पंजाबवर शोककळा
राजवीर जवंदाच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण पंजाबी संगीत आणि चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक नामवंत कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, राजवीरच्या अपघातानंतर दिलजीतने आपला हाँगकाँगमधील लाइव्ह कॉन्सर्ट काही काळासाठी थांबवून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती.
गायक म्हणून राजवीर जवंदा यांनी आपल्या ‘सिंघपुरा’, ‘मुंडा प्यारा’ आणि ‘जट्ट दी जमीन’ या गाण्यांद्वारे लाखो रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांचा आवाज आणि गायकीचा खास शैलीमुळे ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने पंजाबी संगीत सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या त्यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्काराबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावात अंत्यसंस्कार करण्यात येण्याची शक्यता आहे. राजवीर जवंदाच्या अचानक निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि संगीतप्रेमींमध्ये मोठा शोक आहे. त्यांच्या संगीताची आठवण कायम राहील.











