अभिनेते सतीश शाह यांच्या निधनानंतर रुपाली गांगुली ढसाढसा रडल्या

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील ज्येष्ठ आणि बहुगुणी अभिनेते सतीश शाह यांचे 25 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. किडनी फेल झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. चार दशकांहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात आपला ठसा उमटवणारे सतीश शाह हे विनोद, भावनिकता आणि अभिनयाच्या नैसर्गिक शैलीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व शोकसागरात बुडाले आहे. मुंबईतील विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत पार पडले. सतीश शाह यांना त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक फिल्मी आणि टीव्ही कलाकारांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी रूपाली गांगुली ढसढसा रडताना दिसल्या.

सतीश शाह यांना त्यांच्या ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतील ऑन-स्क्रीन मुलगा राजेश कुमार यांनी खांदा दिला. सतीश आणि त्यांच्या पत्नी मधु शाह यांना अपत्य नसल्याने, राजेश कुमारने भावनिक क्षणी पुढे येत ही जबाबदारी पार पाडली. त्या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याच मालिकेतील इतर कलाकार  रत्ना पाठक शाह, रुपाली गांगुली, सुमीत राघवन, देवेन भोजानी, जेडी मजेठिया आणि आतिश कपाडिया  यांनी सतीश शाह यांना शेवटचा निरोप दिला. या प्रसंगी सर्वच कलाकारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विशेष म्हणजे, सतीश शाह यांची ऑन-स्क्रीन सून असलेली रुपाली गांगुली स्वतःला आवरू शकली नाही आणि त्या फूटफूटून रडताना दिसल्या.

रुपालींचे डोळे अश्रूंनी भरून आले

सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हिडिओत ‘साराभाई वर्सेस साराभाई’च्या टीमने त्या मालिकेचं टायटल सॉन्ग एकत्र गायलं आहे. त्यावेळी रुपालींचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि सगळं वातावरण भावूक झालं. फिल्ममेकर अशोक पंडित यांनीदेखील सतीश शाह यांच्या पार्थिव शरीराला खांदा दिला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “एक अद्वितीय अभिनेता आणि प्रेमळ सहकारी हरपला,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

विनोदी कलाकार गमावला

सतीश शाह यांच्या निधनाने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीने एक असामान्य विनोदी कलाकार गमावला आहे. त्यांच्या अभिनयाची जादू, त्यांचा विनोदाचा सच्चा ठसा आणि त्यांच्या नम्र स्वभावाच्या आठवणी कायम प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत राहतील. सतीश शाह यांनी आपल्या कारकिर्दीत सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. ‘ये जो है जिंदगी’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या मालिकांपासून चित्रपटांपर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपल्या खास विनोदी टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकली.

ताज्या बातम्या