Saif Ali Khan : 2025 वर्ष संपत आलं असताना गुगलने जाहीर केलेल्या ‘भारतामधील सर्वाधिक सर्च केलेले सेलिब्रिटी’ यादीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या वर्षी बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स – शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार किंवा हृतिक रोशन – यांच्याऐवजी सैफ अली खान नंबर वन स्थानी पोहोचला आहे. मनोरंजनविश्वात हे स्थान अनपेक्षित मानले जात असले तरी सैफनं ही आघाडी कोणत्याही चित्रपटाच्या रिलीज, प्रमोशन किंवा चर्चेशिवाय मिळवली आहे, ही गोष्ट विशेष ठरते.
2025 मध्ये सैफचा एकही चित्रपट नाही (Saif Ali Khan)
2025 मध्ये सैफचा एकही नवीन प्रोजेक्ट किंवा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तरीही तो भारतातील सर्वाधिक गुगल सर्चमध्ये अव्वल क्रमांकावर कसा? तर याचे कारण म्हणजे जानेवारी 2025 मध्ये घडलेली एक गंभीर आणि धक्कादायक घटना. वांद्रे पश्चिम येथे 12 मजली इमारतीत राहणाऱ्या सैफच्या घरी पहाटेच्या सुमारास एका घुसखोराने प्रवेश केला आणि अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मान, पाठ, हात आणि डोक्यावर मिळून एकूण सहा वार झाले. या घटनेमुळे सैफ गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आपत्कालीन शस्त्रक्रिया करून त्याला बचावले आणि त्यानंतर काही दिवस त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

हल्ल्याची बातमी देशभर पसरली
या हल्ल्याची बातमी काही मिनिटांतच देशभरात पसरली. लोकांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गुगलवर मोठ्या प्रमाणात शोध घेण्यास सुरुवात केली. “Saif Ali Khan health”, “Saif Ali Khan attack”, “Saif Ali Khan hospital update” असे सर्च शब्द एका दिवसात ट्रेंडिंगमध्ये गेले आणि पुढील काही आठवडे सतत गुगल सर्च लिस्टमध्ये त्याचे नाव आघाडीवर राहिले. परिणामी संपूर्ण वर्षभर हा सर्च ट्रॅफिक सुरूच राहिला आणि शेवटी सैफ वर्षातील सर्वाधिक सर्च सेलिब्रिटी ठरला.
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या दहा पथकांसह गुन्हे शाखेच्या आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षा कॅमेरे, परिसरातील हालचाली आणि इतर सर्व शक्यता तपासण्यात आल्या. तपास जसजसा पुढे सरकू लागला, तसतसे लोकांनी या प्रकरणाबद्दल आणखी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सैफचं नाव गुगलवर कायम टॉपवर राहिलं. सैफ अली खानची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर झाली असून काही आठवड्यांतच तो आपल्या नव्या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चाहत्यांनाही त्याच्या कमबॅकची उत्सुकता असून, वर्षभरातील चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर सैफने कोणत्याही चित्रपटाशिवाय 2025 चा गुगल किंग बनण्याचा विक्रम केला आहे.











