बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, आणि यावेळी कारण ठरलं ते प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणीस यांच्या भव्य फॅशन शोमध्ये झालेली त्याची दमदार एंट्री. फडणीस यांच्या ३५ वर्षांच्या फॅशन आणि चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा ‘अनंता’ या शोद्वारे गौरव करण्यात आला. या खास संध्याकाळी, सलमानने शोस्टॉपर बनून रॅम्पवर अशी एंट्री केली की सगळ्यांचे डोळे फक्त त्याच्यावर खिळून राहिले.
शेरवानी घातलेला भाईजान – Salman Khan
रॅम्पवर झळकलेली काळ्या रंगाची भरजरी शेरवानी परिधान केलेला सलमान खान अतिशय देखणा आणि आत्मविश्वासपूर्ण वाटत होता. पारंपरिक डिझाईन आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेली ही पोशाख त्याच्या व्यक्तिमत्त्वात अधिक तेज भरत होती. प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर आणि हूटिंग करत त्याचं जोरदार स्वागत केलं.

या रॅम्प वॉकचा एक विशेष आणि चर्चेचा क्षण ठरला, जेव्हा समोरच्या पहिल्या रांगेत बसलेल्या जया बच्चन आणि श्वेता बच्चन या सलमानच्या भूतपूर्व प्रेयसी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सासू आणि नणंद नजरेस पडल्या. या अनपेक्षित प्रसंगामुळे कार्यक्रमात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. मात्र सलमानने कोणताही संकोच न करता आपल्या खास शैलीत रॅम्पवर आत्मविश्वासाने पावलं टाकली.
कार्यक्रमानंतर सलमान खान म्हणाला, “विक्रम माझ्या अनेक चित्रपटांचा आणि खास क्षणांचा भाग राहिलेला आहे. आम्ही खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखतो. तो केवळ एक डिझायनर नाही, तर एक विश्वासू मित्र आहे. त्याने ३५ वर्षे पूर्ण केली आहेत, हे पाहणं आणि त्या सेलिब्रेशनचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे.”
विक्रम फडणीस यांनीही भावना व्यक्त करताना सांगितलं, “‘अनंता’ म्हणजे केवळ एक कलेक्शन नाही, तर माझ्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याचं, प्रत्येक आठवणीचं आणि सर्जनशीलतेच्या अखंड प्रवाहाचं प्रतीक आहे. सलमानने माझ्यासोबत हा क्षण शेअर केला, हे माझ्यासाठी फार मोठं आहे. आमचं नातं हे फॅशन, सिनेमा आणि मैत्रीच्या पलिकडचं आहे.”
कोणाकोणाची उपस्थिती?
या भव्य फॅशन शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख, सुष्मिता सेन, बिपाशा बसू, तापसी पन्नू, सुनील शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, ईशा देओल, नुसरत भरुचा, करिश्मा तन्ना, चंकी पांडे, कबीर खान, सिकंदर खेर, सुजैन खान, अलवीरा व अतुल अग्निहोत्री, अलिज़ेह अग्निहोत्री, जहीर इकबाल, रोनित रॉय, दिव्या दत्ता, शालिनी पासी यांचा समावेश होता.
‘अनंता’ या शोने विक्रम फडणीसच्या तीन दशकांहून अधिक सर्जनशील प्रवासाला आणि त्यामागील मेहनत, नातेसंबंध आणि कलात्मक योगदानाला सलाम केला. हे केवळ फॅशन शो नव्हतं, तर विक्रमच्या आयुष्यातील अनेक आठवणींना, मैत्रींना आणि अनुभवांना समर्पित असा एक भावनिक क्षण होता. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की, सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याचं स्टारडम आजही तितकंच प्रभावी आहे. त्याची उपस्थिती, त्याची शैली आणि त्याची विनम्रता यांनी हा फॅशन शो अविस्मरणीय बनवला.











