Shahrukh Khan Meet Lionel Messi : कोलकात्यात सध्या फुटबॉलप्रेमींसाठी खास उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लियोनेल मेसी भारत दौऱ्यावर दाखल झाला असून त्याच्या ‘GOAT इंडिया टूर’ची सुरुवात शनिवारी कोलकात्यातून झाली. दुबईमार्गे उशिरा रात्री मेसी कोलकात्यात पोहोचताच चाहत्यांनी जल्लोष करत त्याचं जोरदार स्वागत केलं. अर्जेंटिनाचे झेंडे, घोषणाबाजी आणि प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या दौऱ्यात आणखी एक खास क्षण पाहायला मिळाला तो म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि फुटबॉलचा GOAT लियोनेल मेसी यांची भेट. शाहरुख खान आपल्या लहान मुलगा अबराम खानसोबत मेसीला भेटण्यासाठी कोलकात्यात पोहोचला होता. शनिवारी सकाळी GOAT टूरदरम्यान शाहरुख आणि मेसी यांची भेट झाली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Video Viral (Shahrukh Khan Meet Lionel Messi)
व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान मेसीचं अतिशय आपुलकीनं स्वागत करताना दिसतो. दोघेही हसत-हसत एकमेकांशी हस्तांदोलन करतात. यावेळी शाहरुखने मेसीच्या इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेज आणि रोड्रिगो डी. पॉल यांच्याशीही संवाद साधला. या खास भेटीत शाहरुखने आपला मुलगा अबरामला मेसीशी ओळख करून दिली. अबरामचा आनंद पाहण्यासारखा होता. मेसीचा मोठा चाहता असलेल्या अबरामने केवळ हस्तांदोलनच केलं नाही, तर मेसीकडून ऑटोग्राफही घेतला.Shahrukh Khan Meet Lionel Messi
सोशल मीडियावर चर्चा
शाहरुख खान आणि लियोनेल मेसी यांची ही भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक युजर्स हा व्हिडीओ शेअर करत या क्षणाला ऐतिहासिक म्हणत आहेत. एका फॅन पेजने व्हिडीओ शेअर करत “इतिहास घडला आहे, कोलकात्यात किंग शाहरुख खान GOAT मेसीला भेटला” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरने “जेव्हा सिनेमा आणि फुटबॉलची महानता एकत्र येते” अशी भावना व्यक्त केली आहे. अनेकांनी हा क्षण जगातील दोन दिग्गजांची भेट असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे लियोनेल मेसी यापूर्वी 2011 साली भारतात आला होता. त्यानंतर तब्बल अनेक वर्षांनंतर हा त्याचा भारतातील दुसरा दौरा आहे. कोलकात्यानंतर मेसी हैदराबाद आणि मुंबईतही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण असताना, शाहरुख खान आणि मेसी यांच्या भेटीमुळे हा दौरा अधिकच खास ठरत आहे.





