Saugandh Fame Actress: मनोरंजन जगतात दररोज काही ना काही रंजक गोष्टी घडत असतात. कलाकार सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. चित्रपट असो किंवा कलाकारांचे खाजगी आयुष्य चाहत्यांनासुद्धा त्यामध्ये फारच रस असतो. चाहते नेहमीच आपल्या आवडत्या कलाकारांबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. तर दुसरीकडे कलाकारसुद्धा नवनवीन गोष्टी करत चाहत्यांना आश्चर्यचकित करत असतात. असंच काहीसं अभिनेत्री शांतिप्रियाने केलं आहे. शांती प्रियाच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना चकित करून सोडले आहे.
अक्षय कुमारच्या ‘सौगंध’ या चित्रपटातील सह कलाकार अभिनेत्री शांती प्रिया सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या चर्चेचं कारण तिचे लेटेस्ट फोटो आहेत. शांती प्रियाने चक्क टक्कल करत सर्वांनाच चकित केलं आहे. अभिनेत्रीने काही वेळेपूर्वी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अगदी डॅशिंग दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने आपले संपूर्ण केस कट करत चक्क टक्कल केलं आहे. केस हेच सौंदर्याचे प्रतीक असतात या सामाजिक परंपरेला छेद देत शांतीने आपले फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा-
शांती प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चांगले लाईक्स मिळत असतात. तर अनेकजण कमेंट्स करून आपले करत असतात. शांती प्रियाच्या या बाल्ड लूकवरसुद्धा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. काहींना तिचा हा लूक फारच आवडला. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान अभिनेत्रीने तिच्या दिवंगत पतीचे ब्लेझर घालून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जे त्यांच्या उबदारपणा आणि स्मृतीचे प्रतीक आहे. शांती प्रियाच्या धाडसी कृतीमुळे चर्चेला उधाण आले आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी तिचे कौतुक केले आहे. जे तिच्या धाडसाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक करतात. तिचे परिवर्तन हे आठवण करून देते की सौंदर्य स्वतःच्या अभिव्यक्तीमध्ये आणि सामाजिक साच्यांपासून मुक्त होण्यात आहे.
अभिनेत्रीची इंस्टाग्राम पोस्ट-
शांती प्रियाने तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे, “मी अलिकडेच टक्कल केलं आणि माझा अनुभव खूपच चांगला आहे. महिला म्हणून आपण अनेकदा आयुष्यात मर्यादा घालतो. नियमांचे पालन करतो आणि स्वतःलाही बंदिस्त ठेवतो. या परिवर्तनासह, मी स्वतःला मुक्त केले आहे. मर्यादांपासून मुक्त केले आहे. आणि जगाने आपल्यावर लावलेल्या सौंदर्य मानकांना तोडण्याचा माझा हेतू आहे आणि मी ते माझ्या हृदयातील धैर्याने आणि श्रद्धेने केले”











