sholay re release: 50 वर्षांनंतर शोले ‘या’ दिवशी 1,500 स्क्रीन्सवर पुन्हा रिलीज होणार; प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी

Rohit Shinde

बॉलिवूड इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुपरहिट चित्रपट शोले पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. यंदा शोले ओरिजनल क्लायमॅक्ससह रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रि- रिलीजवर काम करणारी कंपनी हेरिटेज फाउंडेशनने शोलेला 4K मध्ये तयार केले असून ‘शोले द फायनल कट’ असं या चित्रपटाला नाव देण्यात आले आहे.

कोणत्या तारखेला सिनेमा होणार रिलीज?

रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले पुढील महिन्यात १२ डिसेंबर २०२५ रोजी देशातील तब्बल १५०० स्क्रीनवर रि-रिलीज करण्यात येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ओरिजनल क्लायमॅक्सची अनेक वेळा चर्चा झाली आहे मात्र आता तो क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. फिल्म हेरिटेज फाउंडेशनने “शोले” चे 4K रिस्टोअरिंग पूर्ण केले. मूळ क्लायमॅक्समध्ये, ठाकूर गब्बर सिंगला पायांनी चिरडून मारतो. मात्र तेव्हा सेन्सॉर बोर्डाने रिलीज होण्यापूर्वी क्लायमॅक्समध्ये बदल केला.

५० वर्षांनंतर मूळ क्लायमॅक्ससह चित्रपट प्रदर्शित करणे ही टीमसाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी यांचा “शोले” हा चित्रपट अजूनही भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपटांपैकी एक मानला जातो. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, संजीव कुमार आणि इतर कलाकार या चित्रपटाचा भाग होते.

शोले चित्रपटाची प्रेक्षकांच्या मनावर छाप

शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर आणि कालातीत चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप निर्माण केली आहे की आजही त्यातील संवाद, पात्रे आणि प्रसंग लोकांच्या आठवणीत ताजे आहेत. जय-वीरूची मैत्री, गब्बरचा खलनायकी अदा, ठाकूरांचे व्यक्तिमत्त्व आणि बसंतीची निरागसता यांनी भारतीय सिनेमात एक वेगळाच ठसा उमटवला. त्यातील संगीत, कथा आणि अभिनय यांनी शोलेला एक वेगळेच स्थान प्राप्त करून दिले. अनेक पिढ्यांनी हा चित्रपट पाहिला आणि प्रत्येक पिढीला तो तितकाच भावला. त्यामुळे शोलेची लोकप्रियता काळानुसार वाढतच गेली असून तिचा प्रभाव आजही कायम आहे.

ताज्या बातम्या