बॉलिवूडमध्ये लवकरच एक भव्य आणि ऐतिहासिक बायोपिक प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी महान दिग्दर्शक, प्रयोगशील फिल्ममेकर आणि भारतीय सिनेमाातील खऱ्या अर्थाने ‘बागी’ म्हणून ओळखले जाणारे व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे नावही साधे, पण प्रभावी V. Shantaram. या बहुप्रतिक्षित बायोपिकचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
कसा दिसतोय सिद्धांत चतुर्वेदी
रिलीज झालेल्या पहिल्या पोस्टरमध्ये सिद्धांत चतुर्वेदी धोती-कुर्ता आणि टोपी घातलेल्या शांताराम यांच्या लूकमध्ये दिसून येतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, करारीपणा आणि कलात्मकता पोस्टरमध्ये उठून दिसते. प्रेक्षक आणि सिनेप्रेमींनी हा लूक पाहून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

व्ही. शांताराम भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मोठ नाव
व्ही. शांताराम हे नाव भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पण काळाच्या ओघात त्यांच्या कार्याची भव्यता जितकी असावी तितकी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली नाही. ते मनोरंजनासोबत समाजाला आरसा दाखवणाऱ्या कथांमध्ये विश्वास ठेवणारे दिग्दर्शक होते. ‘नवरंग’, ‘दो आँखें बारह हाथ’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ सारख्या चित्रपटांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही नवे स्थान दिले. ‘दो आँखें बारह हाथ’ला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान मिळणे ही त्यांची दूरदृष्टी आणि कलात्मकतेची मोठी पावती मानली जाते.
मूकपटांच्या जगातून रंगीत सिनेमापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर व्ही. शांताराम हे भारतीय सिनेमाला पुढे नेणारे मार्गदर्शक ठरले. त्यांच्या चित्रपटांमध्ये मनोरंजन, सामाजिक संदेश आणि प्रगतिशील दृष्टिकोन यांचा सुंदर मिलाफ दिसतो. म्हणूनच त्यांना भारतीय सिनेमाचे पहिले ‘बागी’ म्हणून संबोधले जाते.
या सर्व संघर्षांनी आणि यशांनी भरलेल्या दिग्गजांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये सिद्धांत चतुर्वेदीची निवड झाली आहे, ही प्रेक्षकांसाठी मोठी उत्सुकतेची बाब आहे. चित्रपटाचा पहिला पोस्टर पाहूनच हा प्रकल्प किती भव्य, गंभीर आणि सिनेमाई दृष्ट्या समृद्ध असेल याची चाहत्यांना कल्पना आली आहे. V. Shantaram’ हा आगामी वर्षातील सर्वांत चर्चेत असलेला चित्रपट ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.











