बॉलिवूडच्या जगात अॅक्शन हिरो म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा सुनील शेट्टी (Sunil Shetty) आता अभिनयाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक क्षेत्रातही जोरदार पाऊल टाकत आहे. चित्रपटसृष्टीत ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा सुनील शेट्टी फक्त सिनेमांच्या पडद्यावरच नव्हे, तर उद्योजकतेच्या क्षेत्रातही तेवढाच दमदार ठरत आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य मुलगा अहान शेट्टी आणि जावई के. एल. राहुल यांच्या सोबत त्याने एक्सेलमोटो या नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे.
स्कूट’ नावाची इलेक्ट्रिक सायकल
या नव्या सहप्रवासात त्यांनी ‘स्कूट’ नावाची एक अनोखी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे, जी विशेषतः महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक, वापरण्यास सोपी आणि हलकी असलेली ही ई-सायकल भारतीय शहरी जीवनशैलीत क्रांती घडवू शकते. ‘स्कूट’ सायकलचा डिझाइन साधा पण आधुनिक आहे. स्कूटरसारखी आरामदायी बेंच सीट, पेडल असिस्ट तंत्रज्ञान आणि बॅलन्स ठेवण्यासाठी उत्तम वजन वितरण ही तिची खास वैशिष्ट्यं आहेत. महिलांसाठी व वृद्धांसाठी ही सायकल वापरणं अतिशय सोपं आहे . ती चालवण्यासाठी परवाना किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. त्यामुळे ही सायकल वैयक्तिक प्रवासासाठी, बाजारात जाण्यासाठी किंवा थोड्या अंतराच्या दैनंदिन कामांसाठी आदर्श ठरते. या ई-सायकलचं उद्दिष्ट म्हणजे सुलभता, स्वातंत्र्य आणि शाश्वतता म्हणजेच प्रत्येकाला आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देणं.

अलीकडेच एक्सेलमोटोने डिलिव्हरी इंडिया लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या सहकार्याद्वारे कंपनी आपला व्यावसायिक विभाग विस्तारत असून, ई-मोबिलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊल ठेवत आहे. भारतात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमुळे एक्सेलमोटोच्या नव्या उत्पादनाला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाला सुनील शेट्टी ? Sunil Shetty
या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना सुनील शेट्टीने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. तो म्हणाला, “ही संधी माझ्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या खूप मोठी होती, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाला स्वच्छ, स्मार्ट आणि शाश्वत बनवण्याच्या या चळवळीचा भाग बनणं. जेव्हा अक्षय (संस्थापक आणि सीईओ), अहान आणि राहुलसोबत ही संधी आली, तेव्हा आम्ही ती सोडू शकलो नाही. त्याने पुढे सांगितलं, “माझ्या काळात हार्ले डेव्हिडसन आणि बुलेट या बाईक्सचं एक वेगळं आकर्षण होतं, पण आजच्या काळात त्या जड आणि अवजड वाटतात. एक्सेलमोटोची ई-सायकल मात्र हलकी, वापरण्यास मजेशीर आणि सर्व वयोगटांसाठी योग्य आहे. ही सायकल चालवणं म्हणजे केवळ प्रवास नाही, तर एक अनुभव आहे.”
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वेगाने वाढणारा बाजार पाहता, एक्सेलमोटोची ‘स्कूट’ सायकल शाश्वत प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात करू शकते. शहरांमधील वाढत्या ट्रॅफिक आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ही हलकी, चार्जिंगसाठी सुलभ आणि परवडणारी ई-सायकल लोकांच्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवू शकते. सुनील शेट्टी नेहमीच फिटनेस आणि स्वच्छतेबाबत जागरूक राहिलेला कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा प्रकल्प केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नाही, तर पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या त्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
‘स्कूट’ च्या माध्यमातून सुनील शेट्टी, (Sunil Shetty) अहान आणि के. एल. राहुल यांनी भारतीय इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. हा उपक्रम केवळ कुटुंबाच्या सहकार्याने सुरू झालेला व्यवसाय नाही, तर भारतीय महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबन आणि सुलभता देण्याच्या दिशेने उचललेलं प्रेरणादायी पाऊल आहे. एकूणच, सुनील शेट्टीचा हा नवा उपक्रम केवळ एक बिझनेस प्रोजेक्ट नसून तो भारतातील स्वच्छ, स्मार्ट आणि शाश्वत वाहतुकीच्या भविष्यासाठी एक सकारात्मक संदेश देणारा प्रयत्न आहे.











