Tamanna Bhatia Look In V Shantaram Movie : सिनेमाजगताला नव्या चर्चेची दिशा देणारी वी. शांताराम यांची बायोपिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धांत चतुर्वेदीच्या शांताराम लुकची चर्चा रंगली होती, आणि आता चित्रपटातून अभिनेत्री तमन्ना भाटियाचा पहिलावहिला लुक समोर आला आहे. या बायोपिकमध्ये तमन्ना, शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी व त्या काळातील ख्यातनाम अभिनेत्री जयश्री यांची भूमिका साकारत आहे.
गुलाबी नऊवारी साडीतला फोटो – Tamanna Bhatia Look In V Shantaram Movie
जयश्री यांनी डॉ. कोटनिस की अमर कहानी, शकुंतला, दहेज यांसारख्या अनेक क्लासिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर पुन्हा जिवंत करण्यासाठी तमन्नाचे निवडले जाणे चाहते आणि समीक्षकांना विशेष भावले आहे. गुलाबी नऊवारी साडीतला तिचा विंटेज अवतार नुकताच प्रदर्शित झाला असून, पोस्टर पाहताच प्रेक्षकांना जणू जुन्या काळात परत गेल्याचा भास होतो. तिच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. Tamanna Bhatia Look In V Shantaram Movie

वी. शांताराम, सिनेमा बदलणारा दूरदर्शी दिग्दर्शक
हा चित्रपट एका अशा दिग्दर्शकाची कथा सांगतो, ज्यांनी कोल्हापूरच्या साध्या वातावरणातून पुढे जात भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी झनक झनक पायल बाजे आणि दो आंखें बारह हाथ यांसारख्या अमर कलाकृती दिल्या. त्यांच्या दिग्दर्शनाने भारतीय सिनेमाची भाषा, सादरीकरण आणि सामाजिक विचारांना नवे वळण मिळाले.
जयश्री साकारणं माझ्यासाठी खास” — तमन्ना
तमन्ना भाटियाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले, “भारतीय सिनेमाच्या सर्वाधिक प्रभावशाली काळातील एक अभिनेत्री साकारणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. जयश्री अत्यंत ग्रेसफुल आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या होत्या. शांतारामजींच्या कलात्मक दृष्टिकोनाला समजून घेताना त्यांच्या मेहनतीची आणि दूरदृष्टीची जाणीव झाली. त्यांची दुनिया पडद्यावर मांडणे हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर्स प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होत आहे. निर्मितीची धुरा राहुल किरण शांताराम, सुभाष काले आणि सरिता अश्विन वार्डे यांनी सांभाळली आहे. दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे करत आहेत. त्यांनी यापूर्वी आणी… डॉ. काशीनाथ घाणेकर ही प्रशंसनीय मराठी बायोपिक दिग्दर्शित केली असून नटसम्राट, टेबल नंबर 21, वझीर आणि ब्रीद सारख्या प्रकल्पांच्या लेखनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तमन्नाचा विंटेज लुक आणि बायोपिकचे भव्य प्रमाण पाहता हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











