The Taj Story : दिल्ली हायकोर्टकडून परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’ला दिलासा; रिलीजवर बंदीची मागणी फेटाळली

Asavari Khedekar Burumbadkar

अभिनेता परेश रावल यांच्या आगामी चित्रपट ‘द ताज स्टोरी’ (The Taj Story) वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या 31 ऑक्टोबर रोजी नियोजित प्रदर्शनाला सध्या तरी दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण? The Taj Story

वकील शकील अब्बास यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांमध्ये फेरफार करण्यात आला आहे आणि त्यातील काही दृश्यांमुळे धार्मिक सौहार्द बिघडण्याची शक्यता आहे. याचिकेनुसार, चित्रपटाच्या टीझर आणि जाहिरातींमध्ये ताजमहालाच्या घुमटाखाली भगवान शिवांची प्रतिमा उभरताना दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे या स्मारकाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भांबाबत जनतेमध्ये वाद निर्माण झाला आहे.

‘द ताज स्टोरी’ (The Taj Story) हा चित्रपट तुषार अमरीश गोयल यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून, सुरेश झा यांनी याचे निर्मितीकार्य सांभाळले आहे. या चित्रपटात परेश रावल, जाकिर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ताजमहालाच्या निर्मितीशी संबंधित वादग्रस्त दावे

चित्रपटात ताजमहालाच्या निर्मितीशी संबंधित वादग्रस्त दावे आणि ऐतिहासिक कथांच्या पारंपरिक दृष्टिकोनाला आव्हान देणारा विषय मांडला आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता चित्रपटाच्या रिलीजला मार्ग मोकळा झाला असून, या चित्रपटाबाबतच्या वादामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.

ताज्या बातम्या