बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांच्या आगामी चित्रपट The Taj Story वरून निर्माण झालेल्या वादावर अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि स्वत: रावल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या चित्रपटाचा एक पोस्टर अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये परेश रावल ताजमहालच्या घुमटाला धरून उभे असून, घुमटाच्या आत शिवमूर्ती असल्याचे दाखवण्यात आले होते. या दृश्यावरून काही लोकांनी असा आरोप केला की, हा चित्रपट ताजमहाल हे पूर्वीचे शिवमंदिर असल्याचा दावा करतो, आणि त्यामुळे धार्मिक वाद निर्माण झाला.
मात्र, या वादावर प्रतिक्रिया देत परेश रावल यांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी स्पष्टपणे लिहिले की, ‘द ताज स्टोरी’ चित्रपट कोणत्याही धार्मिक मुद्यावर आधारित नाही आणि तो ताजमहालच्या आत शिवमंदिर असल्याचा दावा करत नाही. हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित असून, प्रेक्षकांनी चित्रपट पाहून स्वतःची मते बनवावीत, असेही त्यांनी नम्र विनंतीपूर्वक म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याला साथ देत चित्रपटाच्या निर्मात्यांनीदेखील स्पष्टीकरण दिले आहे आणि वाद निर्माण करणारे पोस्टर सोशल मीडियावरून हटवले आहे.

चित्रपटात कोणकोण मुख्य भूमिकेत – The Taj Story
दरम्यान, ‘The Taj Story या चित्रपटात परेश रावल यांच्या सोबत जाकिर हुसेन, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केले असून, तो ३१ ऑक्टोबर २०२५रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही आठवड्यांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये परेश रावल ‘इंटेलेक्चुअल टेररिज्म’ या विषयावर न्यायालयात जोरदार युक्तिवाद करताना दिसतात. त्यामुळे या चित्रपटामध्ये इतिहासाचे वेगळ्या दृष्टिकोनातून सादरीकरण पाहायला मिळणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कधी होणार प्रदर्शित?
एकूणच, चित्रपटावर होणाऱ्या टीका आणि वाद यांचा गैरसमज होऊ नये यासाठी चित्रपटाच्या टीमने वेळेवर स्पष्ट भूमिका घेऊन प्रेक्षकांना आश्वस्त केले आहे. आता सर्वांच्या नजरा ३१ ऑक्टोबरला या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागल्या आहेत.