Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयचा मोठा निर्णय; रामायण’ चित्रपटाची फी दान करणार

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांनी आपल्या आगामी मेगा चित्रपट ‘रामायण’ संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या भव्य चित्रपटात विवेक ओबेरॉय रावणाचा भाऊ विभीषण ही भूमिका साकारत आहेत. मात्र या चित्रपटासाठी मिळणारी आपली संपूर्ण फी ते दान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मला कोणतेही मानधन नको

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत विवेक ओबेरॉय यांनी सांगितले की त्यांनी या चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांना या भूमिकेसाठी कोणतेही मानधन नको आहे. विवेक म्हणाले, “मी नमितजींना सांगितले की मला या चित्रपटासाठी एक पैसाही नको. मला हवे आहे की ही संपूर्ण रक्कम कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी वापरली जावी.”

विवेक ओबेरॉय समाजसेवेत सुद्धा सक्रिय

विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे केवळ एक उत्तम अभिनेता नसून समाजसेवेतही सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आर्थिक मदत केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की ‘रामायण’ हा फक्त एक चित्रपट नाही, तर भारताच्या सांस्कृतिक मुळांना आणि अध्यात्मिक वारशाला जगभर पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. विवेक म्हणाले, “‘रामायण’ हा आपल्या इतिहासाचा आत्मा आहे. या प्रकल्पाचा भाग होणे हे माझ्यासाठी एक मोठे भाग्य आहे.”

चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना विवेक ओबेरॉय यांनी सांगितले की या प्रकल्पावर काम करताना त्यांना एक अत्यंत प्रेरणादायी अनुभव आला. त्यांनी रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि रकुल प्रीत सिंह यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम केल्याचे सांगितले. विवेक म्हणाले की शूटिंगचा प्रत्येक दिवस त्यांच्या दृष्टीने शिकण्यासारखा होता आणि संपूर्ण टीम अत्यंत समर्पितपणे काम करत होती.

‘रामायण: पार्ट 1’ या चित्रपटाचे शूटिंग जून 2025 मध्ये पूर्ण झाले असून सध्या त्याचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. पुढील सुमारे 300 दिवस चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) वर काम होणार आहे, जेणेकरून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जावर सादर करता येईल. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी माता सीता, यश रावण, सनी देओल हनुमान, रवि दुबे लक्ष्मण, काजल अग्रवाल मंदोदरी आणि रकुल प्रीत सिंह शूर्पणखा या भूमिका साकारत आहेत. विवेक ओबेरॉय विभीषणच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ताज्या बातम्या