Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयला पाकिस्तानातून मिळालेल्या धमकीचा धक्कादायक खुलासा

Asavari Khedekar Burumbadkar

Vivek Oberoi : बॉलिवूडमधील कलाकारांवर अंडरवर्ल्डकडून दबाव, धमक्या किंवा दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होतच आले आहेत. काहींवर प्रत्यक्ष हल्ले झाले, तर काहींना फोनवरून गंभीर इशारे देण्यात आले. आता या यादीत आणखी एक नाव पुन्हा समोर आले आहे – अभिनेता विवेक ओबेरॉय. ऐश्वर्या रायसोबतच्या नात्यानंतर अनेक वर्षांनी विवेकची नवी कबुली सिंेमाच्या बाहेरील त्याच्या आयुष्यातील एक धक्कादायक अध्याय उलगडते.

2009 मध्ये घडलेली घटना पुन्हा चर्चेत

विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) एका मुलाखतीत सांगितले की 2009 साली ‘कुर्बान’ चित्रपटाचे चित्रीकरण अमेरिकेत सुरू असताना त्याला एक अज्ञात फोन कॉल आला होता. हा कॉल त्याने उचलला नव्हता; मात्र त्याच्या आंसरिंग मशीनवर एक संदेश नोंदवला गेला होता. त्या संदेशात त्याला जीव घेण्याची आणि सर्वकाही उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हा संदेश ऐकल्यानंतर सुरुवातीला त्याने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, पण प्रॉडक्शन टीमने त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला.

अमेरिकेतील पोलिसांनी केलेली चौकशी

तक्रार नोंदवल्यानंतर अमेरिकन पोलिसांनी त्या नंबरचा तपास सुरू केला. सुरुवातीला कोणत्या व्यक्तीने ही धमकी दिली असावी याबाबत कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. मात्र नंबरचा ट्रेस काढण्यात आला असता तो पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळाल्यानंतर विवेकने (Vivek Oberoi) परिस्थिती गांभीर्याने घेतली. त्याला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी धोका असल्याचे जाणवू लागले. त्या काळात विवेकला अमेरिकेत वकीलही नेमावा लागला आणि कायदेशीर मदत घेऊन प्रकरण पुढे नेले.

मुंबईत परतल्यावरही धमक्या सुरू

अमेरिकेतील शूटिंग संपल्यानंतर विवेक भारतात परतला. मात्र, इथं आल्यावरही त्याला अशाच स्वरुपाचे फोन कॉल येऊ लागले. आधीचे कॉल फक्त एक अपवाद असावेत असे वाटत असताना पुन्हा धमक्या येऊ लागल्याने त्याची चिंता वाढू लागली. अखेर स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार करून त्याने पोलिस संरक्षण स्वीकारले. मुंबई पोलिसांनी त्याच्यासाठी सुरक्षा उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

विवेकने या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की अशा प्रकारच्या धमक्या कलाकारांना मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचे काम करतात. कामाचे वेळापत्रक, प्रवास, कुटुंब—सगळ्याच गोष्टींबाबत काळजी वाढते. मात्र या सर्वांवर मात करून त्याने आपले करिअर सुरू ठेवले. त्याच्या मते, अशा घटनांनी माणूस हादरतो, पण पुढे जाण्यासाठी धैर्य आवश्यक असते.

सध्या ‘मस्ती 4’ मध्ये झळकतोय

विवेक ओबेरॉय सध्या प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती 4’ या चित्रपटात झळकत आहे. अनेक वर्षांनंतर त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले असले तरी, यावेळी त्याने सांगितलेला अनुभव बॉलिवूडच्या अंधाऱ्या बाजूवर प्रकाश टाकणारा आहे.

ताज्या बातम्या