वॉशिंग्टन डीसी- अमेरिकेत रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलचं, आयकॉन ऑफ द सीज, हे जगातलं सगळ्यात मोठं क्रूझ जहाज, मियामी बंदरातून आपल्या पहिल्या यशस्वी सागरी प्रवासासाठी रवाना झालंय. टायटॅनिक जहाजापेक्षा पाचपट मोठ्या असलेल्या या क्रूझवर शौकिनांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत..
365 मीटर लांब आणि अडीचच लाख टन वजनाचं हे जहाज, टायटॅनिकपेक्षा तब्बल पाचपट मोठं आहे. यात 20 मजले असून, 2800 केबिन्समध्ये 5600 प्रवासी आणि 2300 कर्मचारी राहू शकतात. या जहाजावर प्रवाशांना कोणत्याही मोठ्या शहरात मिळणाऱ्या सगळ्या सुविधा मिळणारेत.
आलिशान जहाजावर सर्वात मोठा वॉटर पार्क
‘आयकॉन ऑफ द सीज’ हे मनोरंजनाचं केंद्र आहे. यात सहा थरारक वॉटर स्लाइड्स असलेला समुद्रातील सर्वात मोठा वॉटरपार्क आहे. सात वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंग पूल या क्रूझवर आहेत. आइस स्केटिंग रिंक आणि अॅक्वाडोम नावाचं एक अत्याधुनिक थिएटर आहे, जिथे डायव्हिंग शोजचे आयोजन केलं जातं. खाण्यापिण्याच्या सोयीसाठी जहाजावर ४० हून अधिक रेस्टॉरंट्स आणि बार आहेत. जहाजावर प्रवाशांच्या आवडीनुसार आठ वेगवेगळ्या थीमचे विभाग तयार करण्यात आलेत. कुटुंबांसाठी ‘सर्फसाइड’, खरेदीसाठी ‘रॉयल प्रॉमेनेड’ आणि आकर्षक डायव्हिंग शोजसाठी ‘अॅक्वाडोम’ यांचा समावेश. याशिवाय, ‘सेंट्रल पार्क’ नावाचा एक हिरवागार विभाग देखील आहे.
समुद्रात कसा होतो जहाजाचा प्रवास?
हे जहाज द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) आणि डिझेलवर चालतं, पण LNG च्या वापरामुळे मिथेन वायूच्या उत्सर्जनाबाबत काही पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केलीये. आयकॉन ऑफ द सीज’ सात दिवसांचं पूर्व आणि पश्चिम कॅरिबियन देशांचा प्रवास आयोजित करते. या प्रवासात रॉयल कॅरिबियनच्या खासगी बेट ‘परफेक्ट डे ॲट कोकोके’ ला भेट देण्याची संधीही पर्यटकांना मिळते.
11 लाख रुपये तिकीट
या अविस्मरणीय प्रवासासाठी प्रति व्यक्ती तिकीटाची किंमत 1.43 लाख ते 11 लाख रुपयांपर्यंत आहे, जी सुविधा आणि केबिनच्या प्रकारानुसार बदलते. 2026 पर्यंत या जहाजावरील बुकिंग फुल्ल झाले असून, जहाजाची लोकप्रियताही प्रचंड वाढतेय.
हे भव्य जहाज फक्त प्रवासाचं साधन नाहीये तर ते एक तरंगतं शहर आणि अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना आहे. आयकॉन ऑफ द सीज हे लक्झरी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचा एक अनोखा संगम आहे, जे कुटुंबांसाठी आणि साहसी प्रवासासाठी एक आदर्श पर्याय बनलंय.





