बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड रेल्वेला हा ग्रीन सिग्नल दिला, आणि 40 वर्षांचं बीडकरांचं स्वप्न सत्यात उतरलं. बीड ते अहिल्यानगर असा रेल्वे प्रवास आता बीडकरांना करता येणार आहे. 1997 मध्ये या रेल्वेमार्गाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल २७ वर्षांनंतर अहिल्यानगर-बीड रेल्वे बीडमध्ये पोहोचली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे हे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. बीडमध्ये सुरु झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडे यांना अर्पण करतो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण – देवेंद्र फडणवीस
बीड जिल्ह्याच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर यांनी या रेल्वेचं स्वप्न पहिल्यांदा पाहिलं होतं. पितृपक्षात पितरांना काहीतरी अर्पण करतात, आज गोपीनाथ मुंडे यांना ही रेल्वे समर्पित करतो, असं फडणवीस बोलताना म्हणाले.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ का लागला- अजित पवार
बीडच्या नागरिकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मात्र हा मार्ग पूर्ण होण्यासाठी इतका वेळ का लागला, असा सवालही त्यांनी केला. आत्मचिंतनाची गरज असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. समाजासमाजात तेढ का निर्माण करता आहात, असा सवाल त्यांनी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना यावेळी केला.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे भावूक
यावेळी बोलताना पंकजा मुंडे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. या रेल्वेसाठी कुणाचं योगदान आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही, असं सांगत श्रेयाच्या वादात जाणार नाही, असं पंकजा म्हणाल्या. गोपीनाथ मुंडेंपासून प्रीतम मंडे आणि आता बंजरंग सोनावणे यांनी हा विषय धरुन ठेवल्याचं त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात याला अखेर मूर्त स्वरुप आल्याचंही सांगत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
बीडसाठी रेल्वे कशी गेमचेंजर ?
बीडकरांसाठी या रेल्वेचं नेमकं काय महत्त्व आहे, आणि बीडकरांसाठी कशी गेमचेंजर ठरणार आहे, हे समजून घेऊ…
1. बीड-अहिल्यानगर दरम्यानची रेल्वे स्थानके – 16
2. आठवड्यातून 6 दिवस डिझेलवर धावणार रेल्वे
तिकिटाची रक्कम – 45 रुपये
3. प्रवासाचा कालावधी – 5.35 तास
सकाळी 6.55 वा – अहिल्यानगरहून प्रस्थान
दुपारी 12.30 वा – बीडला पोहोचणार
दुपारी 1 वाजता – बीडहून परतीचा प्रवास
सायंकाळी 6.30 – पुन्हा अहिल्यानगर
4. 261 पैकी 166 किमीचा लोहमार्ग पूर्ण
5. सुरूवातीला प्रकल्पाचा खर्च – 355 कोटी रु.
प्रत्यक्षात प्रकल्पावरील खर्च – 4800 कोटी रु.
राज्य सरकारकडून मिळालेला निधी – 2241 कोटी रु.
1997 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन खासदार रजनी पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रेल्वेचं भूमीपूजन झालं होतं. त्यानंतर आज तब्बल 27 वर्षांनी बीडमध्ये रेल्वे पोहोचलीय. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, अशी घोषणा केली होती ती आज पूर्ण झाली.
परळीकरांच्या पदरी प्रतीक्षाच
अहिल्यानगर ते बीड या टप्प्यात रेल्वे धावू लागल्याने बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालंय.. पण अजूनही बीड ते परळी या टप्प्याचं काम बाकी आहे. त्यामुळे परळीकरांना अद्यापही रेल्वेची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे एकीकडे ४० वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा आनंदही आहे, तर स्वप्नपूर्तीसाठी इतकी वर्ष का बरं लागली? हा सतावणारा प्रश्नही आहे.