MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

सेकंड हँड कार बाजारात मोठा गोंधळ; कमी किंमतीत जुनी कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कारण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
जीएसटी सुधारणेमुळे सेकंड हॅड कार बाजारात आता मोठा बदल पाहायला मिळत आहे. कारण नव्या कार स्वस्त झाल्याने ग्राहकांनी जुन्या कारकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. परिणामी डिलर्सकडून किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
सेकंड हँड कार बाजारात मोठा गोंधळ; कमी किंमतीत जुनी कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कारण काय?

सेकंड हँड जुनी कार खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. जीएसटी कमी झाल्याने नव्या कारवरचा कर जवळपास 60 हजार ते 1.5 लाख रुपयांनी घटला आहे. याचा सर्वाधिक परिणाम अलीकडेच गाडी खरेदी केलेल्या ग्राहकांवर आणि जुन्या कार विक्रेत्यांवर होणार असून त्यामुळे डीलर्समध्ये मोठी हलचल निर्माण झाली आहे. जवळ असणाऱ्या कार विकण्यासाठी डिलर्सची अथवा जुन्या कार विक्रेत्यांची सध्या धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत कमी किंमतीत जुनी कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खरंतर ही दिलासादायक बाब आहे. मंदीत संधी शोधण्याची हीच वेळ आहे.

कमी किंमतीत जुनी कार मिळवा!

अल्टो, वॅगनआरपासून ते नेक्सॉन, थ्रीएक्सओ, आय 10, आय 20 अशा विविध कारच्या किंमतींमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता पश्चात्तापाची भावना होऊ शकते. याशिवाय वापरलेल्या गाड्या विकून कमिशन घेणाऱ्या कंपन्या आणि डीलर्स यांनाही याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. याचा परिणाम म्हणजे विक्रेत्यांना जुन्या कार कमी किंमतीत विकाव्या लागणार आहेत. परिणामी ग्राहक अशा कार खरेदी करू शकतात. ग्राहकांना किमान 1 लाख ते 1.5 लाखांचा फायदा होऊ शकतो.

डिलर्स, जुन्या कारचे विक्रेते अडचणीत

डीलर्स आधीच्या कार मालकांकडून विविध कारणे पुढे करून कमी किंमतीत गाड्या घेतात आणि नंतर त्या दुसऱ्या ग्राहकांना जास्त दर लावून, मोठा नफा ठेवून विकतात. कोरोनाच्या काळापासून सेकंड हँड कारच्या बाजारात एवढी वाढ झाली होती की, किंमती पाहून अनेकांना नवीन गाडीच घ्यावीशी वाटे, पण बजेटमध्ये बसत नसे. मात्र, जीएसटी कपात झाल्याने या गाड्या पुन्हा एकदा खरेदीदारांच्या बजेटमध्ये आल्या आहेत. त्यामुळे डीलर्सना आता गाड्यांच्या जास्तीच्या किंमती ठेवणे कठीण होणार आहे.

जीएसटी दरकपातीमुळे कारच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने डीलर्सना कमी नफ्यावर किंवा कधीकधी खरेदीपेक्षा कमी दरातही गाड्या विकाव्या लागतील. इतकंच नाही तर ज्या व्यक्तींना स्वतःची जुनी गाडी विकायची आहे, त्यांनाही याचा तोटा सोसावा लागणार आहे. दरकपातीचा फायदा नवीन कार खरेदीदारांना मिळत असला तरी विक्रेत्यांना या काळात नुकसान देखील सहन करावे लागणार आहे.