मुंबई- मुंबईकरांच्या प्रावासाला लवकरच अधिक गती मिळणार आहे. कारण मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मेट्रो 3 म्हणजेच अॅक्वा लाईन संपूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच वरळी-कफ परेडदरम्यानची अंतिम पाहणी पूर्ण केली असून, त्यानंतर या प्रकल्पाच्या शुभारंभाला हिरवा कंदील मिळाल्याचं स्पष्ट झालंय. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, त्याच वेळी मेट्रो 3 चा अखेरचा टप्पा त्याचवेळी सुरु होईल असं सांगण्यात येतंय.
मुंबई मेट्रो-३ चा वरळी नाका ते कफ परेड अंतिम टप्पा लवकरच सुरू होतोय. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरे ते कफ परेड हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आता प्रवासाचा वेळ फक्त 60 मिनिटांवर येणार आहे.

कसा होणार मेट्रो-3मुळे फायदा?
१. आरे-वरळी सुमारे 22 किमीचा मार्ग कार्यरत
२.उर्वरित जवळपास 11 किमीचा टप्पा सुरू होणार
३. यानंतर कुलाबा, चर्चगेट, सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर जोडले जातील
४. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांनाही मेट्रो जोडलेली आहे
५. कामकाजासाठी शहरात प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा असेल
मेट्रो 3 कॉरिडोरचा संपूर्ण मार्ग सप्टेंबर 2025 अखेर किंवा ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
कसा आहे मेट्रो-3चा मार्ग?
त्यात आरे कॉलनी, सीप्झ, MIDC, मरोळ नाका, CSMIA T2, सहारा रोड, CSMIA T1, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी, धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य
अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय,महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल,
ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, CSMT, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड या स्टेनांचा समावेश आहे. यापैकी 22 स्टेशन्सवर अॅ्क्वा लाइन आधीच कार्यरत आहे.
मेट्रो-3 प्रकल्पासाठी जवळपास 37 हजार कोटी रुपयांचा खर्च झालाय. हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा आणि खर्चीक प्रकल्प मानला जातो. समुद्रकिनारी वसलेल्या या महानगरात अंडरग्राऊंड मेट्रो बांधण्याचं आव्हान मोठं होतं. पण हे तांत्रिक आव्हान दूर करत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण ॲक्वा लाइन मुंबईकरांच्या आता दाखल होणार आहे.