Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver : कर्जमाफीबद्दल फडणवीसांचं मोठं विधान; शेतकऱ्यांना दिलासा की धक्का??

शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या कर्जमाफीच्या चक्रातून काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल

Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver । शेतकरी कर्जमाफी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठ विधान केले आहे. खरं तर महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वीच आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती. परंतु सत्ता येऊन सुद्धा शेतकऱ्याचा सातबारा अजूनही करा झालेला नाही. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू अशी घोषणा जरी सरकारने केली असली तरी त्यासाठी समिती गठित केल्यानंतर नेमकी कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कर्जमाफीबद्दल मोठं विधान करत म्हटलं की, शेतकरी कर्जमाफी आम्ही निश्चित करणार आहोत परंतु कर्जमाफी बँकेचा फायदा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver

एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल, आम्ही कर्जमाफी निश्चितपणे करणार आहोत. त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे. सगळ्या कर्जमाफीमधे आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही पण बँकांना फायदा जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या कर्जमाफीच्या चक्रातून काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून आपल्याला कशा पद्धतीने कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते आहे.

कुठंतरी सिस्टिम चुकतेय

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपण बघा २०१७ ला आपण कर्जमाफी केली. २०२० ला केली, इतक्या फास्ट कर्जमाफी २- ३ वेळा करायची वेळ येणं याचाच अर्थ कुठेतरी सिस्टमच चूकत आहे. तर त्या सिस्टमला योग्य पद्धतीनं कसं वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरिंग आम्हाला करायचं आहे. फडणवीस यांच्या या विधानानंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, जे गरजू शेतकरी आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.

दरम्यान, मागील आठवड्यातच शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षे स्थगिती दिली. पूर परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबरोबरच सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News