नवी दिल्ली- जीएसटी कपातीनंतर बचत उत्सव सुरु होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानुसार खरंच वास्तवात घडताना आता पाहायला मिळतंय. देशातील टॉप ३ कंपन्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ५१ हजारांपेक्षा जास्त कार विकल्या आहेत. मारुती, हुंडाई आणि टाटा मोटर्स या तीन कंपन्यांचा यात समावेश आहे.

जीएसटीत कपातीची घोषणा केल्यानंतर आणि २२ सप्टेंबरला नवा जीएसटी लागू झाल्यानंतर कारच्या किमती या ४ वर्षांपूर्वीच्या झालेल्या पाहायला मिळतायेत. यासह कंपन्या फेस्टिवलचा डिस्काऊंटही या ऑफरमध्ये देत आहेत. ही फेस्टिवल सूट जवळपास १० टक्क्यांच्या घरात आहे. या सगळ्याचा परिणाम कारच्या विक्रीवर झाल्याचं पाहायला मिळतंय. कार स्वस्त झाल्यानं पहिल्याच दिवशी कारची रेकॉर्डब्रेक विक्री झालीये.
मारुतीनं सेल्सचा ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
मारुती या एकट्या कारच्या ब्रँडनं नवरात्रीच्या पहिल्या दिवसात ३० हजार कार विकल्यात. तर ८० हजार नागरिकांनी या दिवशी गाडी घेण्याबाबत चौकशी केलीय. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की एकाच दिवसात मिळालेला हा प्रतिसाद गेल्या ३० वर्षांतील सर्वोत्तम प्रतिसाद आहे. लहान कारच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत.त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब ही संधी घेण्यासाठी थेट कारच्या शोरुममध्ये आल्याचं पाहायला मिळालंय.
हुंडाईची पाच वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक विक्री
हुंडाईनं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ५ हजार कार विकल्यात. गेल्या ५ वर्षांतील हा त्यांच्या कंपनीचा टॉपमोस्ट परफॉर्मन्स आहे. ग्रँड आय १० नियॉस, क्रेटासारख्या पॉप्युलर मॉडेलची मागणी वाढताना दिसतेय. कर कमी झाल्यानं दुकानांच्या समोर रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय.
टाटाची एका दिवसांत १० हजार गाड्यांची डिलिव्हरी
टाटानंही या पहिल्या दिवशी १० हजार गाड्यांची डिलिव्हरी केली. जो आत्तापर्यंत सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. नेक्सॉन आणि पंच सारख्या एसयूव्ही मॉडेल्सच्या मागणीत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. टाटाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या काळात कारच्या विक्रीच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळेल.
करकपातीसह १० टक्के सूट
कारच्या व्यापारातील जाणकारांच्या मते गेल्यावर्षी पेक्षा गाडीच्या सूटीच्या रकमेतही मोठी वाढ झालेली आहे. गेल्यावर्षी सुमारे ९.३ टक्के इन्सेटिव्ह ग्राहकांना देण्यात येत होता. तो आता १० टक्क्यांच्या आसपास देण्यात येतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपन्या ग्राहकांना जवळपास १० टक्के सूट देत असल्याचं पाहायला मिळतंय.
कंपन्यांची डिस्काऊंटची रक्कम का वाढवली
नवरात्री पासून सणासुदीच्या काळाला सुरुवात होते, दिवाळीपर्यंत बाजारात हा माहौल असतो. नवरात्रीच्या पहिल्या ९ दिवसांत गाडी खरेदी करणं अनेक जणं शुभ मानतात. यावर्षी जानेवारीपासून जूनपर्यंत २२ लाख वाहनांची विक्री झाली. मात्र ही संख्या वाढण्यासाठी कंपन्यांवर दबाव होता. ऑगस्टमध्ये कंपन्यांकडे ५६ दिवसांचा स्टॉक उपलब्ध होता. तर या इंडस्ट्रीसाठी २१ दिवसांचा स्टॉक असणं हेच योग्य मानलं जातं. पेट्रोल गाड्यांवरील सुटीत सुमारे १४ टक्क्यांनी तर डिझेल गाड्यांच्या दरात ३२ टक्क्यांनी सूट देण्यात येते आहे.











