महायुतीची मंडळी कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील, आदित्य ठाकरेंसह विरोधक आक्रमक, अजित पवारांचं काय उत्तर?

Smita Gangurde

मुंबई- लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांना केवळ 500 रुपयेच अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला सरकारच्या इतर योजनांच्या लाभार्थी असल्यानं त्यांना देण्यात येणारं 1500 रुपयांचं अनुदान 500 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी या अर्जांची स्क्रुटूनी करण्यात आली नाही. सरसकट राज्यातील अडीच कोटी महिलांना सुरुवातीला काही महिने पैसे देण्यात आले होते.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत याचा फायदाही झाला. महायुती बहुमतात सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची स्क्रुटूनी सुरु करण्यात आली आहे. त्यात निकषांत न बसणाऱ्या महिलांना मदत देण्यात येणार नाही असा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला. त्यानंतर आता इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ 500 रुपयेच देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. महायुती सरकारच्या या निर्णयावर ही जनतेची फसवणूक असल्याची टीका विरोधक करतायेत.

लाडकी बहीण योजना बंद करतील-आदित्य

लाडकी बहीण योजनेला कात्री लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी टीका केलीय. लाडकी बहीण योजना ५०० रुपयांवर आणून ठेवल्याचं सांगत भविष्यात ही योजना सुरु राहील का, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. अडीच कोटी लाडक्या बहिणींची संख्या गेल्या तीन महिन्यांत 50 लाखांनी कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. महायुतीची मंडळीच कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील, असं भाकितही त्यांनी वर्तवलंय. महायुती सरकारनं पहिल्या १०० दिवसांत सरकारनं काहीच केलं नाही, अशी टीका या शिबिरात आदित्य ठाकरेंनी केलीय.

सरकारवर 420चा गुन्हा दाखल करावा-शरद पवार राष्ट्रवादी

मायभगिनींची घोर फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारवर 420 चा फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये?, असा सवाल शरद पवार राष्ट्रवादीनं उपस्थित केलाय. राज्यातील 8 लाख महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त 500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक नाही का?, असा सवाल करण्यात आलाय. निवडणुकीपूर्वी 2100 रु. चा हप्ता देऊ अशी वल्गना करणारे महायुती सरकार आज 2100 रुपये तर सोडाच, पण मासिक 1500 रुपयेही वेळेवर देत नाही. याउलट ते अजून कसे कमी होतील यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधत आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक आहे.


मतांपुरती लाडकी बहीण- काँग्रेस

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही एक्स पोस्ट करत सरकारच्या या निर्णयावर टीका केलीय. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलंय की, “कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी” अशी मराठीत एक म्हण आहे.
पण महायुती सरकारने “निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण” अशी नवी म्हण रुढ केली आहे.
कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतक-यांची मते घेतली सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नाही चूपचाप पैसे भरा असे मस्तवालपणे सांगत आहेत. विविध कारणे देऊन सातत्याने लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले जाते आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारकडूत फक्त जनतेचा विश्वासघात आणि फसवणूकच सुरु आहे.

योजना बंद होणार नाही -अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या या टीकेला उत्तर दिलंय. कोणत्याही स्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. या अर्थसंकल्पात 36 हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आल्याची आठवणही त्यांनी करुन दिलीय. लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, सुरुवातीला या विरोधकांनीच या योजनेवरुन टीका केली होती. असंही अजित पवार म्हणालेत.

ताज्या बातम्या