‘अमूल’चा ग्राहकांना मोठा दिलासा; अनेक उत्पादने होणार स्वस्त, यादी बघून आश्यर्य वाटेल…

Rohit Shinde

देशातील सर्वात मोठा दुग्धजन्य पदार्थ ब्रँड असलेल्या अमूलने आपल्या उत्पादनांच्या किमती कमी करून ग्राहकांना लक्षणीय दिलासा दिला आहे. कमी केलेल्या जीएसटी दरांचे फायदे ग्राहकांना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २२ सप्टेंबरपासून देशभरात हे नवे दर लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ…

अमूलचा ग्राहकांना मोठा दिलासा

कंपनीने तूप, लोणी, आईस्क्रीम, चीज आणि चॉकलेटसह ७०० हून अधिक वस्तूंच्या पॅकच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने (GCMMF) सांगितले की, हा बदल २२ सप्टेंबरपासून लागू होईल. जीएसटी दरांमध्ये कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून देखील कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.

कोणते उत्पादन किती रूपयांने स्वस्त?

१०० ग्रॅम बटरची कमाल किरकोळ किंमत ६२ रुपयांवरून ५८ रुपये करण्यात आली आहे. तुपाच्या किमती ४० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ते ६१० रुपये प्रति लिटरला उपलब्ध झाले आहे. एवढेच नाही तर, अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक (१ किलो) आता ५४५ रुपयांना उपलब्ध होईल, तर पूर्वी त्याची किंमत ५७५ रुपये होती. फ्रोझन पनीरची (२०० ग्रॅम) किंमत ९९ रुपयांवरून ९५ रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आइस्क्रीम, बेकरी उत्पादने, माल्ट-आधारित पेये, शेंगदाणा स्प्रेड आणि चॉकलेटच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

अमूलचे म्हणणे आहे की भारतात दुग्धजन्य पदार्थांचा दरडोई वापर अजूनही खूप कमी आहे. या किमती कमी केल्याने वापर वाढेल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे हे मात्र नक्की. अमूलच्या आधी, मदर डेअरीनेही त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या किमतीच्या स्पर्धेमुळे ग्राहकांनाच फायदा होणार नाही तर बाजारपेठेत वापरही वाढेल. ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.

ताज्या बातम्या