Sunday Mega Block : मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (दिनांक ०५.१०.२०२५) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
दरम्यान, मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते १५.५५ पर्यंत रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील पुढे मुलुंड स्थानकावर डाउन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक कुठे?
दुसरीकडे पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत सुटणाऱ्या बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक कुठे?
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाण्याला जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी खंडामध्ये विशेष गाड्या चालवल्या जातील.
ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.
भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक
मध्य रेल्वेद्वारे भायखळा स्थानकावर DSS पॉईंट क्र. 127A चे ५२ किलो विभागाचे ६० किलो विभागात रूपांतर करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवार मध्यरात्री ००.३० ते पहाटे ०४.३० वाजेपर्यंत परळ (वगळून) ते भायखळा (समावेश करून) दरम्यानच्या अप जलद मार्गावर ब्लॉक राहील. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.











