ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा आजच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. झोमॅटो आणि स्विगी सारख्या प्लॅटफॉर्ममुळे लोकांना घरबसल्या विविध प्रकारचे पदार्थ सहज उपलब्ध होतात. व्यस्त जीवनशैली, वेळेअभावी स्वयंपाक करणे अवघड जाणे, तसेच नवीन चवींचा आस्वाद घेण्याची इच्छा यामुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरीची मागणी झपाट्याने वाढली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना काही मिनिटांत आवडता पदार्थ मिळतो.
तसेच डिस्काऊंट, ऑफर्स आणि जलद डिलिव्हरीमुळे लोकांना हे अधिक सोयीचे वाटते. शहरी भागांमध्ये या सेवांचा वापर प्रचंड वाढला असून ग्रामीण भागातही त्याची ओढ वाढत आहे. झोमॅटो आणि स्विगीने ग्राहकांच्या खाद्यसंस्कृतीत मोठा बदल घडवला आहे. मात्र आता आपल्या ग्राहकांना धक्का देत ऐन सणासुदीच्या काळात झोमॅटो आणि स्विगीसारख्या कंपन्यांनी आपल्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला काहीशी कात्रीन लागणार आहे.
प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ करण्याचा निर्णय
झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनी प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो ग्राहकांना आता ऑर्डर देताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यातच 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्जवर 18 टक्के जीएसटी लागू होणार असल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार आणखी वाढणार आहे.
स्विगीने निवडक बाजारपेठांमध्ये आपला प्लॅटफॉर्म चार्ज जीएसटीसह 15 रुपये इतका ठेवला आहे. झोमॅटोने फी वाढवून 12.50 रुपये केली आहे. तर, मॅजिकपिनने देखील उद्योगातील वाढत्या ट्रेंडनुसार बदल करत शुल्क 10 रुपये प्रति ऑर्डर निश्चित केले आहे. अंदाजानुसार, जीएसटी लागू झाल्यावर झोमॅटोच्या ग्राहकांना प्रति ऑर्डर सरासरी 2 रुपये आणि स्विगीच्या ग्राहकांना सुमारे 2.6 रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागणार आहे. मॅजिकपिनचे शुल्क सध्या 10 रुपये इतके आहे, जे स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे.
ग्राहकांची वाढती पसंती; शुल्कात वाढ
एकीकडे ऑनलाईन फूड ऑर्डरला वाढती मिळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या मिळणाऱ्या पसंतीमुळे आणि वाढत्या खर्चामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडील काळात प्लॅटफॉर्म फी या कंपन्यांसाठी उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिनने एकाच वेळी वाढ केलेली फी पाहता हे स्पष्ट होत आहे की, खाद्य वितरण उद्योगातील खर्च झपाट्याने वाढत आहेत. ग्राहकांमधून मात्र या निर्णयाबाबत काहीसा नाराजीचा सुरू पाहायाल मिळत आहे. असे असेल तरी कंपनी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.





