उत्तरेकडील गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्याने थंडीची तीव्र लाट आली आहे. काही ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली घसरल्याने हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. निफाडमध्ये तापमान अधिकच घसरल्याने दबबिंदू गोठल्याचे दिसून आले. आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा प्रभाव
राज्यात गारठा चांगला वाढला असून पारा घसरताना दिसतोय. उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी पहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. राज्यातही थंडीच्या लाटेचा इशारा आहे.

काही ठिराणी पारा 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता राज्यात आहे. परभणी आणि जेऊरमध्ये 7 अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव 7.1 अंश, निफाड 8.3, आहिल्यानगर 8.4 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद झाली. पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, गोदिंया, भंडारा, यवतमाळ, वाशिम या भागात पारा 10 अंशांच्या खाली गेला. गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईत तापमानात काहीशी घट
मुंबईतील सांताक्रूझ येथे मंगळवारी हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तेथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा 3.8 अंश सेल्सिअसने कमी होते. या हंगामातील मागील सर्वात कमी किमान तापमान 16 नोव्हेंबर रोजी 17.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पारा 18 अंश सेल्सिअसखाली नोंदला गेला.
उत्तर-पश्चिम महाराष्ट्र गारठला !
18 नोव्हेंबर रोजी पहाटे जळगाव शहराच्या तापमानाने 23 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला असून, पारा थेट 7.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. यापूर्वी, 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान 7.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. मात्र, सोमवारी रात्री आणि मंगळवारच्या पहाटेच्या तापमानाने हा जुना विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय हवामान खाते आणि ममुराबाद वेधशाळेकडे या विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात थंडिचा कडाका कायम असून पारा मंगळवारी 26.3 कमाल आणि 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान 27 अंशापर्यंत राहिल. तसेच किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस राहिल. साताऱ्यात गारठा वाढत असून धुक्यासह दव पडत आहेत. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











