आता धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार? विधी व न्याय विभागाची नवीन मार्गदर्शक तत्व काय आहेत?

महात्मा फुले योजनेतील उपचाराबाबत दर बदलण्यासाठी आरोग्य विभागाने एक समिती गठित केली आहे. दरम्यान, जर आगामी काळात धर्मादाय रुग्णालयात रुग्णावर मोफत उपचार मिळाले, तर याचा राज्यातील कित्येक रुग्णांना फायदा होईल आणि त्यांना दिलासा मिळेल असे बोलले जाते.

मुंबई – राज्यातील रुग्णांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. आपल्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकांना मोठमोठे आणि चांगले उपचार घेता येत नाहीत. चांगल्या आणि मोठ्या रुग्णालयात उपचार घेता येत नाहीत. परंतु आता राज्य सरकारने रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळण्याबाबत पुढाकार घेतला असून, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजना धर्मादाय रुग्णालयात लागू करण्याबाबत सरकार विचारधीन आहे. रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत विधी व न्याय विभागाने राज्यातील धर्मदाय रुग्णालयासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यात दोन्ही योजनांबाबत धर्मादाय रुग्णालयात रुग्णावर मोफत उपचार मिळण्याबाबत नमूद केले आहे.

राज्यातील 456 धर्मादाय रुग्णालयांपैकी 76 रुग्णालय मुंबईत

दुसरीकडे धर्मदाय रुग्णालय ही मोठ्या प्रमाणात राज्यभर आहेत. राज्यातील विविध भागात म्हणजे नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आदी ठिकाणी धर्मदाय रुग्णालय आहेत. परंतु राज्यातील सर्व मिळून 456 धर्मदाय रुग्णालय आहेत, त्यापैकी 76 रुग्णालय ही एकट्या मुंबईत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील विविध भागात आणि अनेक जिल्ह्यात मोठमोठे रुग्णालय आहेत. ज्यांचा समावेश धर्मदाय रुग्णालय वर्गवारीत करण्यात येतो. त्या रुग्णालयातून ही आता महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली तर सर्व नागरिकांना गोर-गरीब रुग्णांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

धर्मादाय रुग्णालयात शासकीय योजना लागू कराव्यात

दरम्यान, राज्यातील मोठमोठे रुग्णालय आहेत. तिथे गोरगरीब आणि सामान्य लोकांना पैसाअभावी उपचार घेता येत नाहीत. या ठिकाणीही या योजना लागू कराव्यात अशी मागणी होत होती. धर्मादाय सहायुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने धर्मादाय रुग्णालयासाठी काही शिफारशी केल्या आहेत. त्या शिफारशीनुसार राज्यातील कुठलाही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये. यासाठी राज्यातील धर्मदाय रुग्णांनी आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि राष्ट्रीय बाल संस्था कार्यक्रम आदी आरोग्याची योजना लागू कराव्यात असं चौकशी समितीने सांगितले होते. तर या धर्मादाय रुग्णालयात शासकीय योजना लागू कराव्यात असे सांगण्यात होते. मात्र अनेक धर्मादाय रुग्णालय ही योजना लागू होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. महात्मा फुले योजनेतील उपचाराबाबत दर बदलण्यासाठी आरोग्य विभागाने एक समिती गठित केली आहे. दरम्यान, जर आगामी काळात धर्मादाय रुग्णालयात रुग्णावर मोफत उपचार मिळाले, तर याचा राज्यातील कित्येक रुग्णांना फायदा होईल आणि त्यांना दिलासा मिळेल असे बोलले जाते.


About Author

Astha Sutar

Other Latest News