MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

थंड की गरम, कोणत्या पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Written by:Smita Gangurde
Published:
आंघोळीला तुम्ही दैंनदिन काम मानता का? जर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे.
थंड की गरम, कोणत्या पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर?

आंघोळीला तुम्ही दैंनदिन काम मानता का? जर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे. आंघोळ ही तुमचं मानसिक आरोग्य, हेअर केअर आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवू शकतं. प्रसिद्ध आहारतज्त्र आणि पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आंघोळीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. आंघोळ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, केस गळणे कमी होते आणि तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त होता.

सकाळी आणि रात्री आंघोळ करण्याची पद्धत कशी असावी, आंघोळीपूर्वी पाणी पिणे आवश्यक आहे का, गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड…याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सोनिया नारंग सांगतात…

सकाळी थंड पाण्याने आणि रात्री गरम पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीपूर्वी एक ग्लास भरून पाणी प्यावं, यामुळे तुमचा रक्तदाब सामान्य राहतो. आंघोळीची सुरुवात थेट डोक्यापासून करू नये. म्हणजे गरम पाणी डोक्यावर ओतू नये. त्यामुळे केस कमकुवत होऊ शकतात. गरम पाण्याने आंघोळ करीत असाल तर शेवटची दोन मिनिटं थंड पाणी अंगावर घ्या, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

सकाळी थंड पाण्याने आंघोळ का करावी..

सकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमची झोप उडते. मेंदू रिचार्ज करण्यासाठी हे आवश्यक आहे. थंड पाण्यामुळे मेंदूतील त्वचेच्या सेन्सर्सना सक्रीय करतं. यातून नॉरएड्रेनालाइन नावाचं हार्मोन बाहेर पडत असतं. ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि एकाग्रता राहते.


रात्री गरम पाण्यानेच आंघोळ का करावी?

आपल्या शरीराला रात्रीच्या वेळी आरामाची गरज असते. त्यामुळे त्या काळात गरम पाण्याची निवड योग्य असते. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. त्याशिवाय चांगली झोप लागते. गरम पाणी पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रीय करते.

आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास पाणी का प्याव?

रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी एक ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. शरीर डिहायड्रेटेड असेल तर चक्कर येणे किंवा बेहोशी होऊ शकते. पाणी पिण्यामुळे रक्ताभिसरण संतुलित राहते आणि चक्कर येणे टाळता येते.

डोक्यावर गरम पाणी का घेऊ नये?

डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केस गळणे, कोरडेपणा येणे किंवा कोंडा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गरम पाण्यामुळे टाळूवरचे नैसर्गिक तेल कमी करते, त्यामुळे केस कोरडे होतात. कोंडाही वाढतो. त्यामुळे डोक्यावर नेहमीच कोमट किंवा थंड पाणी घ्यावं.