MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

गणेश चतुर्थीला बनवा कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थ, पाहा निवगऱ्याची रेसिपी

Published:
कोकणात गणेश चतुर्थीनिमित्त अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. कोकणात गणेश चतुर्थीला निवगऱ्या बनवल्या जातात.
गणेश चतुर्थीला बनवा कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थ, पाहा निवगऱ्याची रेसिपी

Ganesh Chaturthi Recipes Marathi:    महाराष्ट्रात गणेश चतुर्थीची धामधूम सुरु आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. आज धूमधडाक्यात बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज आहेत. घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य आणि प्रसाद बनवला जात आहे. उकडीचे मोदक यामध्ये आवर्जून पाहायला मिळतात. शिवाय अनेक पारंपरिक पदार्थसुद्धा बनवले जातात. यातील एक पदार्थ म्हणजे निवगऱ्या होय. निवगऱ्या हा पदार्थ विशेषतः कोकणात बनवला जातो.

कोकणात गणेश चतुर्थीनिमित्त अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. कोकणात गणेश चतुर्थीला निवगऱ्या बनवल्या जातात. अनेकजण मोदक बनवून शिल्लक राहिलेल्या उकडीचे काय करायचे म्हणून त्यापासून विविध पदार्थ बनवतात. शिवाय काहीजण तूप घालून उकड खातात. पण कोकणात निवगऱ्या करण्यासाठी आवर्जून उकड काढून ठेवली जाते. आज आपण निवगऱ्याची पारंपरिक स्पेशल रेसिपी जाणून घेऊया…

 

निवगऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

तांदळाची उकड

जिरे

हिरवी मिरची

कोथिंबीर

जिरेपूड

मीठ चवीनुसार

तेल गरजेनुसार

 

निवगऱ्या बनवण्याची पारंपरिक रेसिपी-

 

निवगऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदळाची उकड घेऊन त्यात पाणी घालून थोडे सैल करून घ्यावे. या पदार्थामध्ये दुसरा कोणताही मसाला किंवा आले-लसूण घातले जात नाही. तरीसुद्धा याची चव अगदी उत्तम लागते.

आता या पिठामध्ये हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट करून घालायची. नंतर हिरवीगार ताजी कोथिंबीर घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन बारीक चिरून घ्यायची. आता बारीक कोथिंबीर या उकडीमध्ये मिसळून घ्यायची.

आता या उकडीमध्ये जिरेपूड आणि जीरेसुद्धा घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे.

आता या तयार मिश्रणाचे छोटा-छोटे गोळे करून हलक्या हाताने चपटे करून घ्यायचे. मोदकाला स्टीमर ठेवतो त्याप्रमाणे स्टीमरमध्ये पाणी उकळवून तयार गोळ्यांना वाफ देऊन घ्यायची.

अशाप्रकारे कोकणातील पारंपरिक निवगऱ्या तयार आहेत. निवगऱ्या तुम्ही हिरव्या मिरचीचा खर्डा आणि दह्यासोबत खाऊ शकता.