MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक, उकड काढण्यापासून सारण बनवण्यापर्यंतची रेसिपी

Published:
आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारचे मोदक उपलब्ध आहेत. परंतु आजही सर्वांना घरी बनवलेले उकडीचे मोदकच सर्वात जास्त आवडतात.
Ganesh Chaturthi 2025:  गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक, उकड काढण्यापासून सारण बनवण्यापर्यंतची रेसिपी

Ukadiche Modak Recipe Marathi:   आज गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. घरोघरी आज बाप्पा विराजमान होणार आहेत. बाप्पाच्या स्वागताची तयारी आता पूर्ण झाली आहे. घरातील महिलांना बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध आवडते पदार्थ बनवण्याचे वेध लागले आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे नैवेद्यात मोदक आवर्जून बनवले जातात.

आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारचे मोदक उपलब्ध आहेत. परंतु आजही सर्वांना घरी बनवलेले उकडीचे मोदकच सर्वात जास्त आवडतात. त्यामुळे महिला घरीच मोदक बनवायला प्राधान्य देतात. परंतु घरी उकडीचे मोदक बनवणे अनेकांना जमत नाही. यामध्ये उकड काढणे म्हणजे एक कलाच आहे. उकड व्यवस्थित जमली कि मोदक अगदी उत्तम बनतात. आज आपण व्यवस्थित उकड काढून मऊ लुसलुशीत मोदक कसे बनवायचे ते जाणून घेऊया….

 

उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

तांदळाचे पीठ- ११/२ वाटी

तूप- १टीस्पून

दूध- १/४ कप

खसखस- १टेबलस्पून

खिसलेला ताजा नारळ- २ कप

गूळ – १ कप

सुकामेवा- आवडीनुसार

वेलची पावडर- १/४ चमचे

जायफळ पावडर

केशर

मीठ- चिमूटभर

 

उकडीचे मोदक बनवण्याची पारंपरिक रेसिपी-

 

उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी एका एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि तूप घालून चांगले मिसळा.

नंतर त्यात दूध घालून घ्या. दुधाने मोदकांना छान पांढराशुभ्र रंग येतो.

आता या पिठात हळूहळू पाणी घालून चपातीच्या पिठासारखे मऊसूत पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावे.

स्टीमरचे भांडे घेऊन त्यात केळीचे पान किंवा सुती कापड ठेऊन पीठ पसरवून घ्या. स्टीमरच्या खालच्या भांड्यात एक इंच होईल इतके पाणी घालून घ्या. आता पिठाला चांगली उकड काढून घ्या.

उकड काढताना १० ते १५ मिनिटे पीठ चांगले वाफवा. नंतर गॅस बंद करा आणि पीठ आणखी १० मिनिटे स्टीमरमध्ये झाकून ठेवा.

आता एका कढईमध्ये खसखस घेऊन चांगली भाजून घ्या. नंतर खोबऱ्याची किस चांगली त्यातील पाणी सुकेपर्यंत भाजून घ्या.

आता त्यामध्ये गूळ आणि सुकामेवा घालून चांगले मिक्स करून घ्या. गूळ वितळल्यानंतर ४-५ मिनिटे अजून भाजून घ्या.

आता या मिश्रणात वेलची पूड, जायफळ घालून मिक्स करा अशाप्रकारे सारण तयार आहे.

आता उकड घेऊन चांगले हलक्या हाताने मळून घ्या. नंतर उकड झाकून ठेवा म्हणजे ती थंड होणार नाही.

आता उकडमधून एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन त्याची मध्यम आकाराची पारी लाटून घ्या. त्याच्या कडा चिमटवून त्याला कळ्या पाडून घ्या. आता त्यामध्ये तयार सारण भरून हलक्या हाताने कडा बंद करून मोदकाचा आकार द्या. मोदक बनवताना तुम्ही हाताला थंड पाणी लावू शकता. जेणेकरून पीठ चिकटणार नाही.

आता स्टीमरमध्ये एक १ ते २ इंच पाणी घालून चांगली उकळी काढा. त्यामुळे केळीचे पान किंवा सुती कापड ठेऊन मोदकांना १० मिनिटे वाफवा. अशाप्रकारे तुमचे उकडीचे मोदक तयार आहेत.