अवघ्या दोन दिवसांवर नारळी पौर्णिया येऊन ठेपली आहे. यंदा ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात.
नारळी पौर्णिमेचं महत्त्व…
पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव समुद्रात जातो. कोळी बांधवांमध्ये हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात या भागात हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात करण्याची प्रथा आहे. नारळ घातलेला हा गोड भात बहुतांश घरांमध्ये आवर्जुन केला जातो. तुम्ही हा गोड भात ट्राय केला नसेल तर नक्की करू पाहा.
नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असते. त्यामुळे अनेक घरांमध्ये लाडक्या भावासाठी हा गोड भात करण्याची पद्धत आहे.
गोड भात किंवा नारळी भात तयार करण्याची पद्धत…(Narali Bhat kasa karal)
साहित्य – बासमती किंवा कोणताही सुंगधी तांदूळ, साखर, खवलेला नारळ किंवा नारळाचं दूध, अख्खी वेलची किंवा वेलची पूड, तूप आणि चवीपुरतं मीठ…
कृती – आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर पातेल्यात तूप घ्यावे. गोडाचा पदार्थ असल्याने यात आवर्जुन तुपाचा वापर करावा. तूप तापल्यानंतर वेलची घालावी (शेवटी वेलचीची पूड घातली तरी चालेल) वेलची चांगली परतून घ्यावी. यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ घालावा आणि तुपात छान परतून घ्यावा. यानंतर तांदळाच्या अडीच पट नारळाचं दूध घालावं. यात तांदूळ चांगला शिजवून घ्यावा. तांदूळ शिजल्यानंतर त्याला जितका तांदूळ तितकी साखर घालावी. गोड जास्त हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता. यानंतर मंद आचेवर झाकण लावून भात शिजू द्यावा. साखरेचं पाणी आटल्यानंतर वरून काजू-बदाम आणि चमचाभर तूप घालून सर्व्ह करावा.
टिप – नारळाच्या दुधाऐवजी खवलेला नारळ वापरला तरी चालेल. अशावेळी पाणी आणि थोड दूध घालून भात शिजवून घ्यावा./ साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरी चालेल, साखरेच्या तुलनेत गुळ जास्त लागू शकतो





