Home remedies for toothache: दाढदुखीची समस्या सामान्य आहे. परंतु दाढेमध्ये प्रचंड वेदना होत असल्यास काहीच सुचत नाही. दाढ दुखत असल्यास मान, डोके, कान सर्वच भागात वेदना व्हायला लागतात. त्यामुळे अधिक त्रास होतो. अनेकजण दाढ दुखायला लागल्यास औषधे घेतात. परंतु त्याऐवजी काही घरगुती उपायसुद्धा करता येतात.
दाढदुखीवर अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्या मदतीने दाढदुखीच्या वेदना कमी होतात. शिवाय या उपयांचा दुष्परिणामही होत नाही. त्यामुळे तुम्ही हे उपाय सहज करू शकता. दाढ दुखत असल्यास हे उपाय केल्यास तुम्हाला अवश्य फायदा मिळेल. आज आपण दाढदुखीच्या समस्येवर असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया…..

पेरूची पाने-
पेरूच्या पानामध्येसुद्धा अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे दाढदुखीमध्ये पेरूच्या पानांचा फायदा होतो. यासाठी चांगली कीड न लागलेली पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्या. ही पाने पाण्यात उकळा. आता या पाण्याने चूळ भरा. १० ते १५ मिनिटे असे करत राहा. हळूहळू दाढ दुखायची थांबेल.
गरम पाणी-
गरम पाण्यामुळे दाढदुखी थांबण्यास मदत मिळते. यासाठी गरम पाणी घेऊन त्यात मीठ मिसळून घ्या. आता या पाण्याने दुखणारी दाढ शेकून घ्या. यासाठी थोडे-थोडे पाणी तोंडात पकडून दाढेला शेक मिळेल असे करा. १० ते १५ मिनिटे असे केल्याने दाढेच्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
लवंग-
भारतीय स्वयंपाकघरात लवंग नक्कीच असते. लवंगमध्ये जेवणाची चव वाढवण्यासोबतच औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्याच्या वापराने दाढदुखी कमी करता येते. यासाठी जी दाढ दुखत आहे त्यामध्ये लवंग पकडा. असे केल्याने दाढदुखी कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय तुम्ही लवंग पाण्यात उकळून चूळ भरू शकता. त्यानेसुद्धा दाढदुखीमध्ये आराम मिळेल.
कांदा-
कांद्यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे दाढदुखीमध्ये कांदासुद्धा उपयुक्त आहे. यासाठी कांद्याचा एक छोटा तुकडा कापून तो दुखणाऱ्या दाढेमध्ये ठेवा. तुम्हाला जर कांद्याचा तुकडा ठेवण्यास अडचण येत असेल, तर तुम्ही कांदा किसून घ्या. त्याच्या रसामध्ये एक कापसाचा बोळा बुडवा आणि तो दाढेमध्ये पकडा. असे केल्याने काही वेळेतच दाढ दुखायची थांबेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











