लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळविताना गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या महिलांनी जसे सरकारला गंडवले, अगदी तसेच जवळपास 14 हजार पुरूषांनी सरकारला गंडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्या पैशांचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारकडुन या प्रकरणी आता छाननी सुरू आहे.
14 हजार पुरूषांनी 21 कोटी लाटले!
बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. तेव्हापासून लाभार्थी महिलाना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. मात्र इतर योजनांप्रमाणेच या योजनेचाही लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांनी पैसे लाटल्याची माहिती समोर आली होती. आता याच योजनेत आणखी एक गैरप्रकार झाल्याचेही समोर आले असून लाडक्या बहीणींसाठी सुरू केलेल्या या योजनेचाकाही लाडक्या भावांनाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
तब्बल 14 हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्या पैशांचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरूषांनी 1500 रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा 21 कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
पुरूषांनी महिलांच्या नावाने लाटले पैसे
पुरूष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेत ते पैसे मिळवल्याचीही शंका आहे. याच नावांची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असून 14 हजार 289 पुरूष ला़की बहीणच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे उघड झाल्यावर आता त्यांना मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात आले आहेत. मात्र या पुरूषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले, सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
यापूर्वीही लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी ही योजना असतानाही, अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले, अनेक तक्रारीदेखील आल्या. या प्रकरणात सरकारने आता प्रशासनाच्या मदतीने अधिकची तपासणी सुरू केली आहे. या योजनेमध्ये आणखी काही गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार असण्याची शक्यता आहे. सरकारला त्याबाबत संशय असून अधिकचा तपास केला जाणार आहे.





