मुंबई- महायुती सरकारनं सुरु केलेल्या लाडक्या बहीण योजनेमुळं सत्ता मिळाली असली तरी यातून दररोज नवनवे वाद निर्माण होताना दिसतायेत. निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी याचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर आता पडताळणी सुरु करण्यात आलीय. त्यात सुमारे 14 हजारांच्यावर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर येतेय.
महिलांच्या नावानं पुरूषच योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय असून, त्याची छाननी सुरू असल्याचं आता सरकारकडून सांगण्यात आलंय. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरूषांकडून लाटलेलं मानधन वसूल करण्याची कारवाई आता सरकार सुरू करणाराय
पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट 2024 पासून तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना सुरू केली. राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचं मानधन देण्याची ही योजना आहे. या योजनेमुळंच महिलांनी महायुतीच्या बाजूनं निवडणुकीत भरभरून मतदान टाकलं आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आलं. मात्र निकषांचं काटेकोर पालन न झाल्यानं लाडकी बहीण योजनेत पुरूषांनीही कसे हात धुऊन घेतले, याचे आकडे आता समोर आलेत…
पुरूषांनी कसा मारला डल्ला?
लाडकी बहीण योजनेवर सरकार वर्षाकाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करतंय. मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क 14298 पुरुषांनी घेतल्याचं उघड झालंय. गेल्या दहा महिन्यात या लाडक्या पुरुषांना 21 कोटी 44 लाख रुपयांचं वाटप झालं
आणखी धक्कादायक बाब म्हणजे, 2 लाख 36 हजार लाभार्थ्यांच्या नावांबाबत अजूनही शंका आहे
आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरूषांकडून लाटलेलं मानधन वसूल करण्याची कारवाई आता सरकार सुरू करणाराय
हे पुरुष यादीत घुसवले कुणी?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या यादीमध्ये हे पुरुष कुणी घुसवले याची आता चौकशी करण्यात येईल. 65 वर्षे वयावरील महिलांसाठी इतर योजनांचा लाभ मिळत असल्यानं लाडकी बहीण योजनेसाठी त्या पात्र नसतील, असाही निकष सरकारनं ठरवला होता. मात्र ज्येष्ठ नागरिक महिलांनीही
घेतला योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय.
65 वर्षांवरील 2 लाख 87 हजार महिलांनी या योजनेचा लाभ उचलला आहे. गेल्या 10 महिन्यात तब्बल 431 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेत. आता या वयोवृद्ध महिला लाभार्थी देखील योजनेतून वगळल्या जाणार आहेत.
एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी
एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही असाही नियम आहे
मात्र एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची 7 लाख 97 हजार प्रकरणं समोर आली आहेत. त्यांना आतापर्यंत 1196 कोटी रुपयांचं वाटप झालंय अशा प्रकरणांतील महिलांना लाभार्थींच्या यादीतून वगळण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. आता ही पडताळणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर होईल असंही सांगण्यात येतंय.
लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका
लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करावे लागत असल्यानं राज्य सरकारच्या बाकीच्या विकासकामांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. त्यात आता लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरूषांनी आणि वयोवृद्ध महिलांनीही लाटल्याचं समोर आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणात सरकार काय कारवाई करणार, हे आता पाहावं लागणार आहे.





