MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

लाखो महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र; सरकारची ‘त्या’ महिलांवर कारवाई सुरू

Written by:Rohit Shinde
Published:
योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांपैकी तब्बल 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने ही माहिती अधिकृतरित्या जाहीर केली असून शासनाने याबाबत कारवाई सुरू केली आहे.
लाखो महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र; सरकारची ‘त्या’ महिलांवर कारवाई सुरू

लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या पैशांची प्रतीक्षा सुरू असताना आता दुसरी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये मिळणाऱ्या महिलांपैकी तब्बल 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने ही माहिती अधिकृतरित्या जाहीर केली असून शासनाने याबाबत कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींना या पैशाला मुकावे लागणार आहे. शिवाय कारवाईला देखील सामोर जावे लागू शकते.

अपात्र महिलांवर कारवाई होणार -आदिती तटकरे

पात्रतेच्या अटींनुसार, लाभार्थी महिलांनी इतर कोणतीही शासकीय योजना घेऊ नये. मात्र तपासणीत असे आढळून आले की, अनेक महिलांनी एकापेक्षा जास्त योजना घेतल्या आहेत. त्यामुळे अशा अर्जदारांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली की, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने सर्व लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये अपात्र ठरलेल्या लाखो महिलांची माहिती समोर आली असून त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत मिळेल, अशी माहिती समोर येत आहे. या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून, ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. जुलै महिना संपायला केवळ 9 दिवस बाकी आहेत. त्यामुळे या उर्वरित दिवसांमध्ये कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात. जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैचा हप्ताही उशिराने मिळेल का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.