स्वातंत्र्यांच्या 77 वर्षानंतर बीड-अहिल्यानगर मार्गावर रेल्वे धावली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला!

परळी - बीड - अहिल्यानगर असा 261 किमीचा हा संपूर्ण रेल्वे मार्ग आहे. पहिला टप्पा आज बीड ते अहिल्यानगर सुरू झाला आहे.

बीडमधून आजपासून पहिली रेल्वे सुरू झाली आहे. बीड ते अहिल्यानगर या जवळपास १६० किमीसाठी ही रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला आज 17 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला. परळी – बीड – अहिल्यानगर असा 261 किमीचा हा संपूर्ण रेल्वे मार्ग आहे. पहिला टप्पा आज बीड ते अहिल्यानगर सुरू झाला आहे. पुढील वर्षापर्यंत हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुरू होणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

बीड ते अहिल्यानगर या दोन स्थानकांदरम्यान साडे पाच तासांचा वेळ लागणार आहे. या मार्गावर 16 स्टेशन्स आहेत. या बीड ते अहिल्यानगर मार्गासाठी 45 रुपये तिकीट आहे. ही रेल्वे आठवड्यातील सहा दिवस सोमवार ते शनिवार या दिवसांत धावणार असून रविवारी रेल्वे धावणार नाही. सकाळी सहा वाजता अहिल्यानगरहून गाडी क्रमांक 71441 निघून दुपारी साडे बाराला बीडला पोहोचेल. त्यानंतर तीच ट्रेन गाडी क्रमांक 71442 दुपारी एक वाजता बीडहून निघून संध्याकाळी साडे सहाला अहिल्यानगरमध्ये पोहोचेल.

बीड-नगरच्या प्रवाशांना दिलासा मिळणार

या मार्गासाठी 4,805 कोटी खर्च असून राज्य आणि केंद्र सरकार दोघे 50 टक्के निधी देत आहेत. बीड, राजुरी, रायमोर, विगणवाडी, घाटनांदुर, आंबळनेर, बावी, किणी, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह, अहिल्यानगर ही सोळा स्थानके खरंतर या मार्गावर असणार आहेत. बीड- अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांना या रेल्वेमुळे खरंतर मोठा दिलासा मिळणार आहे. जनतेतून या प्रकल्पाच्या पूर्णत्वावर समाधान व्यक्त केले जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News