नाशिक- वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ आता त्यांच्या सिन्नर मतदारसंघातील जनता उतरताना दिसणार आहे. रमीच्या डावावरुन कृषिमंत्री अडचणीत आलेले असताना, आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सिन्नरमध्ये उद्या कोकाटे यांचे समर्थक शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी करून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक एकत्र येणार आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता कोकाटे समर्थक सिन्नरच्या बस स्थानकावर एकवटणार आहेत. आपण काय वाईट कृत्य केलं असा सवाल करत कोकाटे यांनी यापूर्वीच राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
मारहाण झालेल्या विजय घाडगेंची अजित पवारांसोबत भेट
लातूरमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेतील रमी खेळण्याबाबत जाब विचारलेल्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यत्र विजय घाटगे यांना मारहाण करण्यात आली होती. अजित पवार राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आणि इतरांनी त्यांना मारहाण केली होती. याचे जोरदार पडसाद राज्यात उमटले होते. त्यानंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला होता. यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या विजय घाडगे यांनी शुक्रवारी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचं अजित पवारांनी आश्वासन घाडगेंना दिल्याची माहिती आहे.
कोकाटेंवर मंगळवारपर्यंत कारवाई होणार?
घाडगे आणि अजित पवार यांच्या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्यावर मंगळवारपर्यंत कारवाई होईल, असं आश्वासन अजित पवारांनी दिल्याचं विजय घाडगे यांनी सांगितलं आहे. कोकाटे यांच्याबाबत झालेल्या वादानंतर सोमवारी किंवा मंगळवारी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांच्या कृषिमंत्रीपदाचा कार्यभार मकरंद पाटील यांच्याकडे सोपवला जाईल अशीही चर्चा आहे. तर मकरंद पाटील यांच्याकडे असलेलं खातं कोकाटेंना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही तर आंदोलन
माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचं आश्वासन अजित पावरांनी दिलंय. मात्र कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा छावाच्या वतीनं देण्यात आला आहे. आता अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष आहे.





