मुंबईकरांसाठी विशेष म्हणजे समुद्र किनारी भागात जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठा अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. नागरिकांनो, काळजी घ्या… कारण, मुंबईतील समुद्राला मोठी भरती येणार आहे. सलग चार दिवस ही भरती येणार आहे. 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात समुद्राला मोठी भरती येणार असून उंचच उंच लाटा उसळणार आहेत. भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत समुद्राला भरती; अलर्ट जारी
4 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 या काळात समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान साडेचार ते पाच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीची तारीख आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे.
6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजून 39 मिनिटांनी 5.03 उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी.
नेमकी कशी असेल समुद्राची भरती ?
- गुरुवार, 4 डिसेंबर 2025 – रात्री – 11.52 वा. – लाटांची उंची – 4.96 मीटर
- शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 – सकाळी – 11.30 वा. – लाटांची उंची – 4.14 मीटर
- शनिवार, 6 डिसेंबर 2025 – मध्यरात्री – 12.39 वा. – लाटांची उंची – 5.03 मीटर
- शनिवार, 6 डिसेंबर 2025 – दुपारी – 12.20 वा. – लाटांची उंची – 4.17 मीटर
- रविवार, 6 डिसेंबर 2025 – मध्यरात्री – 1.27 वा. – लाटांची उंची – 5.01 मीटर
- रविवार, 7 डिसेंबर 2025 – दुपारी – 1.10 वा. – लाटांची उंची – 4.15 मीटर
भरतीच्या वेळी नेमकी कशी काळजी घ्यावी ?
समुद्राच्या भरतीच्या वेळी काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते, कारण पाण्याची पातळी अचानक वाढू शकते आणि प्रवाहही वेगाने बदलू शकतो. अशावेळी किनाऱ्याजवळ उभे राहणे किंवा पाण्यात उतरून खेळणे टाळावे. भरतीची वेळ आणि हवामानाचा अंदाज स्थानिक प्रशासनाकडून किंवा लाइफगार्डकडून जाणून घ्यावा. धोकादायक किंवा लाल झेंडा लावलेल्या भागात प्रवेश करू नये. मुलांना किनाऱ्यापासून दूर ठेवावे आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे. भरतीच्या वेळी येणाऱ्या मोठ्या लाटांपासून सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. मोबाईल, कॅमेरा किंवा इतर वस्तू घेऊन पाण्याजवळ न जाणे योग्य. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित लाइफगार्ड किंवा पोलीस हेल्पलाइनचा संपर्क साधावा.

