सध्या मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे. लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. पाणी साचल्यामुळे प्रशासनासमोरही मोठं संकट उभं राहिलं आहे.
पावसामुळे ट्रेन रद्द…
दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान सगळ्या ट्रेन उद्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण ७ ट्रेन रद्द तर ४ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उद्या २० ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे मुंबई मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान उपनगरीय सेवा पुन्हा सुरू
मुसळधार पाऊस आणि त्यामुळे पाणी साचल्याने आणि अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा संध्याकाळी ७.२८ वाजता पुन्हा सुरू झाली. ठाण्यासाठी पहिली रेल्वे सीएसएमटीहून सायंकाळी ७.२८ वाजता सुटली. १९ ऑगस्ट रोजी सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान अप आणि डाउन जलद आणि धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा अनुक्रमे सकाळी ११.२५ आणि ११.४० वाजता मुख्य मार्गावरील बंद करण्यात आल्या. हार्बर मार्गावरील सीएसएमटी आणि मानखुर्द दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी ११.२० वाजता बंद करण्यात आल्या.
तथापि, ठाणे ते कसारा/कर्जत दरम्यान मुख्य मार्गावर, पनवेल ते मानखुर्द आणि ठाणे ते ट्रान्स-हार्बर मार्गावर वाशी दरम्यान उपनगरीय सेवा सुरू होत्या. नेरुळ/बेलापूर आणि उरणवरील उपनगरीय रेल्वे सेवाही सुरू होत्या. सकाळी ११.२० पासून बंद असलेली सीएसएमटी आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानची उपनगरीय रेल्वे सेवा दुपारी १.३० वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात आले आहेत श्री धर्मवीर मीना, महाव्यवस्थापक, विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी नियंत्रण कक्षात उपस्थित होते आणि परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत होते.





