Devendra Fadnavis : मुंबईची रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते, तर महामंडळाची लालपरी अर्थात एसटी ही गाव खेड्यातील लोकांसाठी दळणवळणाचे मुख्य साधन आहे. दरम्यान, आता राज्याच्या परिवहन विभागाकडून नागरिकांना सेवा देण्यासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, तसेच नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे.
परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत आयोजित बैठक पार पडली. या बैठकीला पोलिस आयुक्त देवेन भारती, महानगर आयुक्त संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सेवा
दरम्यान, कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलिस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार
सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात कुर्ला या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल. कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशन, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता जागतिक दर्जाची सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशनबाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.











