डिजिटल व्यवहारांच्या युगात Digi Gold हा गुंतवणुकीचा एक नवा आणि सोयीस्कर पर्याय म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. कमी रकमेपासून गुंतवणूक करता येणे, त्वरित खरेदी-विक्रीची सुविधा आणि सुरक्षित वॉल्टमध्ये सोन्याचे संग्रहन यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा कल याकडे वाढत आहे. भौतिक सोन्याच्या तुलनेत वाहतूक, साठवण आणि शुद्धतेची चिंता नसल्याने Digi Gold अधिक सुलभ मानला जातो. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची किंमत तुलनेने स्थिर राहते, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी Digi Gold हा एक आकर्षक पर्याय बनत आहे. मात्र, गुंतवणुकीपूर्वी प्लॅटफॉर्मची विश्वसनीयता तपासणे महत्त्वाचे आहे. याच संदर्भात आता भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात SEBI ने महत्वपूर्ण इशारा दिला आहे. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना पुरेशी सावधानता बाळगण्याचे आवाहन गुंतवणूकदारांना करण्यात आले आहे.
सेबीचा गुंतवणूकदारांना महत्वाचा इशारा
सेबीच्या मते जर एखाद्या प्लॅटफॉर्मकडून रक्कम थकली तर अशा स्थितीत सेबीकडे गुंतवणूकदारांना सुरक्षित ठेवण्याचं कोणतंही साधन नाही. सेबीनं डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी पूर्णपणे सावध राहावं, असं म्हटलं आहे. थोडक्यात तुम्ही पूर्णपणे डिजिटल गोल्डमधील गुंतवणूकीला स्वत: जबाबदार असाल, यामध्ये कोणीही तुमची जबाबदारी घेणार नाही. अथवा कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे दाद मागण्याच्या पर्याय तुमच्याकडे नसेल. डिजिटल गोल्ड इंडस्ट्रीचं नियमन सेबीकडून केलं जात नाही. मात्र, यासंदर्भातील मागणी दीर्घ काळापासून केली जात आहे. त्यामुळे डिजी गोल्डमध्ये गुंतवणूक करताना सावधान रहावे, सेबी सध्या गोल्ड ईटीएफ आणि ट्रेडेबल गोल्ड सिक्यूरिटीजमध्ये केलेल्या सोन्यातील गुंतवणुकीचं नियमन करते. या दोन्हीतील गुंतवणूक सेबीच्या कक्षेत येते.
DIGI GOLD मध्ये गुंतवणूक फायदेशीर?
Digi Gold मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असल्यामुळे आधुनिक गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यंत कमी रकमेतही सोने खरेदी करता येते. २४ तास कधीही खरेदी-विक्री करण्याची सुविधा असल्याने लिक्विडिटी जास्त मिळते. भौतिक सोन्याप्रमाणे साठवण, सुरक्षा किंवा चोरीची भीती नसते, कारण सोने वॉल्टमध्ये सुरक्षित ठेवलेले असते. शुद्धतेची खात्री मिळते आणि व्यवहार पूर्णपणे डिजिटल असल्याने सोपे आणि पारदर्शक असतात. छोटे-छोटे हिस्स्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन सोन्याचा संचय करणे शक्य होते. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय शोधणाऱ्यांसाठी Digi Gold एक लवचिक, सुलभ आणि आधुनिक पर्याय मानला जातो.












