महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेची आणि नागरिकांची चिंता वाढवणारी अशी एक बातमी समोर आली आहे. कारण, महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा शिरकाव झाला आहे. मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, स्नायू वेदना, सूजलेले लिम्फ नोड्स, आणि त्वचेवर फोड किंवा पुरळ येणे. यामुळे अपवादात्मक परिस्थितीत रूग्णांचा मृत्यू देखील होत असतो.
धुळ्यात मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण
जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा ज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे.

मंकी पॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता. मात्र, येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो दि. १३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला. त्यानंतर तो मंकी पॉक्स बाधित असल्याची बाब समोर आली आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे आणि उपाय
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य संसर्ग असून त्याची लक्षणे सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, स्नायू वेदना, थकवा आणि सूजलेले लिम्फ नोड्स अशी दिसतात. काही दिवसांनंतर त्वचेवर पुरळ येतात, जे चेहरा, हात, पाय आणि शरीरावर पसरतात. पुरळ फोडांमध्ये बदलतात आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजारासाठी विशेष औषध नसले तरी रुग्णाला विश्रांती, पुरेसे पाणी आणि पोषक आहार देणे आवश्यक आहे. फोडांना स्पर्श करू नये आणि संक्रमित व्यक्तीपासून दूर राहावे. स्वच्छता राखणे, हात वारंवार धुणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हे प्रतिबंधासाठी सर्वात प्रभावी उपाय आहेत.