Bhupathi Surrender : मोस्ट वॉन्टेड भूपतीसह 60 माओवादी गडचिरोली पोलिसांसमोर शरण

Rohit Shinde

नक्षल चळवळीला हादरा बसला आहे. माओवादी चळवळीचा सर्वोच्च चेहरा म्हणून ओळखला जाणारा वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने अखेर शरणागती पत्करली आहे. त्याच्यासोबत जवळपास 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याची माहिती समोर येत आहे.

मोस्ट वॉन्टेड भूपती अखेरीस शरण

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील दंडकारण्य परिसरात गेली अनेक दशके माओवादी चळवळीचा सर्वोच्च चेहरा म्हणून ओळखला जाणारा वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने अखेर शरणागती पत्करली आहे. 10 कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस डोक्यावर असलेला हा मोस्ट वॉन्टेड माओवादी गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे 60 सहकाऱ्यांसह शरण आल्याची खळबळजनक माहिती 14 ऑक्टोबर रोजी समोर आली आहे.

माओवादी चळवळीचा शेवट जवळ?

भूपती महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. त्याच्या शरणागतीमुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा पल्लवित झाली आहे. चार दशकांपासून दंडकारण्याच्या घनदाट जंगलात टिकून राहिलेल्या माओवादी चळवळीच्या शेवटच्या टप्प्याची ही सुरुवात मानली जात आहे.

भूपती हा आज 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे शस्त्रे खाली ठेवून भारतीय संविधान हाती घेणार आहे. भूपतीने यापूर्वी युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यामुळे माओवादी चळवळीतील केंद्रीय नेतृत्वाशी त्याचे मतभेद निर्माण झाले होते आणि चळवळीत उभी फूट पडल्याचे दिसून आले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशभरातून माओवाद मुळासकट संपवण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या प्रभावाखालील भागांमध्ये आक्रमक मोहिम सुरू आहेत. अनेक महत्त्वाचे नेते चकमकीत मारले गेले, तर काहींनी आत्मसमर्पण केले आहे.

ताज्या बातम्या