मुंबईतील घरांच्या किंमतींमध्ये अवास्तव वाढ झाल्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी घर खरेदी करणे अधिक कठीण झाले आहे. वाढलेले बांधकाम खर्च, बँकांचे कर्जदर, आणि उच्च करभार यामुळे बाजारातील घरांच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नव्या खरेदीदारांचा प्रतिसाद कमी झाला आहे. अनेक प्रकल्पांमध्ये विक्री मंदावली असून, बांधकामदारांना विक्रीसाठी आकर्षक ऑफर्स द्याव्या लागत आहेत.
या परिस्थितीमुळे रिअल इस्टेट बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये किंमती घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटलेली मागणी लक्षात घेत आगामी काळात घरांच्या किंमती घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय एकीकडे म्हाडाच्या घरांना देखील मुंबईत चांगला प्रतिसाद मिळतोय, तर सिडकोची बरीच घरे विक्रीविना पडून आहेत.

मुंबईत घरांची विक्री 14% घटली !
यंदा ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये ११ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात १४ टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपाने दिसून आला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १३ हजार २०० मालमत्तांची विक्री झाली होती. त्याद्वारे राज्य सरकारला १२०५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
यंदाच्या वर्षी महसुलात १७ टक्क्यांची घट होत १००४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यंदा ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. वास्तविक, या सणामध्ये गृहविक्रीला चालना मिळणे अपेक्षित होते. पण सणासुदीतही घर खर्चासाठीचे बजेट जुळत नसल्याने ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.
मुंंबईत घरांच्या किंमती कमी होणार ?
घरांच्या मागणीत घसरण झाल्यावर बिल्डर्स, विकासक त्यावर एकतर बड्या ऑफर्स आणतात. अथवा घराच्या किंमती कमी करतात. अथवा इतर काही आमिषं, जॅकपॉट अशा योजना आणून घरांची विक्री करतात. गृह प्रकल्पासाठीचा खर्च निघावा आणि तोटा होऊ नये यासाठी विकासक प्रयत्न करतात. त्यात ग्राहकांचीही फायदा असतो.
त्यामुळे जर गृह विक्री अशीच कमी राहिली तर ग्राहकांना भविष्यात सध्याच्या दरांपेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. रिएल इस्टेटमध्ये मंदीचे सावट आल्यावर नवीन गृह प्रकल्पांना विकासक हात घालत नाहीत. त्यांना हे प्रकल्प अंगावर पडण्याची भीती असते. त्यामुळे आगामी काळात मुंबई शहरातील घरांच्या किंमतींमध्ये विक्रमी घट होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. ग्राहक देखील अशा संधीच्या प्रतिक्षेत आहेत.