राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महायुती सरकारने मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्य कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्यातील सर्व कर्मचारी, पेन्शन धारकांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्य कर्मचारी आणि पेन्शन धारकांना जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 असे एकूण 08 महिन्यांची डी. ए. थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढ लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता 53 टक्क्यावरुन 55 टक्के झाला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासन सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र असणारे अधिकारी, कर्मचारी व राज्य पेन्शन धारक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सदर वाढीव डी.ए चा लाभ मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का मिळतो?
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance) महागाईच्या वाढत्या दरामुळे मिळतो. देशातील महागाई दर वाढल्याने वस्तू, सेवा आणि दैनंदिन गरजांच्या किंमती वाढतात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची खरी क्रयशक्ती कमी होते. या आर्थिक ताणातून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार महागाई भत्ता देते. हा भत्ता मूलभूत पगाराच्या ठरावीक टक्केवारीनुसार ठरतो आणि दर सहा महिने किंवा वर्षातून दोनदा महागाई निर्देशांकानुसार वाढवला जातो. महागाई भत्ता हा पगाराचा भाग असला तरी निवृत्तीवेतनधारकांनाही तो लागू होतो. यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकून राहते आणि वाढत्या खर्चाचा ताण काही प्रमाणात कमी होतो.





