MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

मोठी बातमी! आई तुळजाभवानीचे गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत राहणार बंद; भाविकांना मुख दर्शनाची मुभा!

Written by:Rohit Shinde
Published:
तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहे.
मोठी बातमी! आई तुळजाभवानीचे गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत राहणार बंद; भाविकांना मुख दर्शनाची मुभा!

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. मंदीर प्रशासनाने तशी माहिती दिली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अधिक काळ मुख दर्शन रांगेत उभे राहावे लागू शकते.

संवर्धनाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय

तुळजाभवानी मंदिरातील सिंहगाभाऱ्याच्या संवर्धनाच्या कामामुळे भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही.मंदिर संस्थानने यासंदर्भात माहिती दिली असून, आता 20 ऑगस्ट 2025 पर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.याआधी 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात आले होते.मात्र, संवर्धनाचं काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे दर्शन बंदीचा कालावधी आणखी दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे.भाविकांना मात्र निराश होण्याचं कारण नाही.

भाविकांसाठी मुख दर्शन सुरू राहणार

देवीचं मुखदर्शन, सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. कारण, पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलं आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील 10 दिवस भाविकांना मुखदर्शनच घेता येईल.20 ऑगस्टनंतर गाभाऱ्यातील नियमित दर्शन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भाविकांना फक्त बाह्य दर्शनावर समाधान मानावं लागणार आहे.तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख कुलदेवी असून, लाखो भाविक दररोज तिच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात.

तुळजापूरला दर्शनासाठी भक्तांची गर्दी

दरम्यान, महाराष्ट्रांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला महाराष्ट्रच नव्हे तर आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या भागातून येणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड मोठी आहे. या ठिकाणी मुख दर्शन आणि गाभाऱ्यातील धर्म दर्शनामुळे गर्दी नियंत्रित होत असते. अशा परिस्थितीत आता गाभाऱ्यातील दर्शन बंद झाल्यास मुख दर्शनाच्या रांगेतील प्रतीक्षा कालावधी वाढू शकतो. याचा भक्तांना काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. मंदीर प्रशासनाने आधीच सूचना दिल्याने भाविकांना योग्य नियोजन करता येणार आहे.