MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट; दुधाच्या दरामध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ

Written by:Rohit Shinde
Published:
गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांना सणाच्या निमित्ताने मोठं गिफ्ट देत गाई आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट; दुधाच्या दरामध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे. या संघामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला हमीभाव मिळतो आणि त्यांना बाजारातील चढउताराची भीती राहत नाही. गोकूळ संघ शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देतो तसेच जनावरांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा, चारा आणि पोषणविषयक मार्गदर्शनही उपलब्ध करून देतो. या संघामुळे ग्रामीण भागातील हजारो शेतकरी स्वावलंबी झाले आहेत. अशा या परिस्थितीत गोकूळ दूध संघाने गणेशोत्सवाच्या काळात शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दूधाच्या दरामध्ये काहीशी वाढ करण्यात आली आहे.

दुधाला 1 रूपया अधिकचा भाव मिळणार!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांना सणाच्या निमित्ताने मोठं गिफ्ट देत गाई आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून सणासुदीच्या काळात त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

गोकुळने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, म्हशीच्या दूधाचा खरेदी दर: प्रतिलिटर 50.50 रुपयांवरून 51.50 रुपये तर दुसरीकडे गाईच्या दूधाचा खरेदी दर: प्रतिलिटर 32 रुपयांवरून 33 रुपये झाला आहे. यामुळे शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरवाढीचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसे पडावेत, त्यांचे अर्थसंकल्प सुलभ व्हावेत, या उद्देशाने गोकुळने हा निर्णय घेतल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुग्ध व्यवसायात अधिक स्थिरता आणि शाश्वत उत्पन्नाची हमी मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. गोकूळने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होताना दिसत आहे.