फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून परीक्षांचा निकाल कधी लागणार असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडलेला आहे. आता या निकालाच्या तारखांबाबतचा एक अंदाज समोर आला आहे. त्या तारखेला निकाल लागण्याची शक्यता आहे.
निकाल नेमका कधी, तारीख काय?
निकालाची अधिकृत तारीख अद्याप समोर आली नसली तरी, दहावी आणि बारावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार येत्या 15 मे पर्यंत दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती समोर येत आहे. 5 ते 10 जून दरम्यान दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो, तर 15 मे पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

अधिकृत घोषणा बाकी
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एक पत्रकार परिषद देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
निकाल जितका लवकर जाहीर होईल त्याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी होत असतो. पुढे प्रवेश घेणे, योग्य महाविद्यालयांची निवड करणे यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळत असतो. त्यामुळे निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहे. शिवाय काही विद्यार्थ्यांना अपयश आल्यास त्यांची परीक्षा लगेच घेता येईल, जेणेकरून त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेतली जाते.
2025 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे 15 लाख विद्यार्थी बसले होते. एकूण 21 लाखांहून अधिक विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी उपस्थित होते. mahresult.nic.in mahahsscboard.in hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर तुम्ही निकाल पाहू शकता.