पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणखी दीड वर्ष लांब आहे. पण महायुतीत आतापासूनच कुरघोडीचं राजकारण सुरू झालं आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पदवीधर मतदार संघातून शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली. पण याच मतदारसंघातून प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यासाठी आग्रही असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी इतक्या लवकर उमेदवारी घोषित करण्याचं कारण काय? असा सवाल उपस्थित केला आहे. यामुळे महायुतीतील दोन्ही मंत्र्यांमध्ये राजकीय वैर निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.
पुणे पदवीधर निवडणुकीवरून रणकंदन
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच ताकाला येऊन भांडं लपवण्यात काय अर्थ म्हणत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुणे पदवीधरसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर केला. चंद्रकांत पाटलांनी शरद लाड यांचं नाव घोषित केलं. शरद लाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आहेत. त्यांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीच शरद लाड यांच्या उमेदवारीची एकप्रकारे घोषणा केली.

राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या आधी कागलच्या प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नावाची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यामुळे या जागेवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान आमदार अरुण लाड यांनी मागच्यावेळी पुढच्या निवडणुकीत भैय्या माने यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याआधीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली. चंद्रकांतदादांना भेटल्यानंतर “आताच उमेदवारी घोषित करण्याचं कारण काय?” असा प्रश्न आम्ही विचारणार असल्याचंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.











